जात वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना हमीपत्राच्या आधारे राखीव प्रवर्गासाठी प्रवेशपात्र ठरविण्यात येणार आहे. या सवलतीमुळे अनेक प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र प्रवेश मिळाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे.
२०१३-१४ या शैक्षणिक वर्षांपासून ‘तंत्रशिक्षण संचालनालया’च्या ‘केंद्रीय प्रवेश प्रक्रिये’तून (कॅप) अभियांत्रिकीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जागावाटप झाल्यानंतर प्रवेश घेते वेळी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आले होते. प्रवेश घेतल्यानंतर तीन महिन्यांच्या आत प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत दिली जात असे. अनेकदा विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या तोंडावरच हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धावाधाव करतात.
समाजकल्याण विभागाच्या दिरंगाईमुळे अनेक विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र वेळेत मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र सादर करता येत नसे. परिणामी अनेक गुंतागुंतीचे न्यायालयीन वाद उद्भवत असल्याने या वर्षीपासून ही सवलत बंद करण्यात आली होती. पण, अनेक विद्यार्थ्यांना ही प्रमाणपत्र अजुनही न मिळाल्याने गेल्या वर्षीची सवलत पुन्हा सुरू करावी, असा दबाव संचालनालयावर येत होता. त्यामुळे, या वर्षीही ही सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यानुसार प्रवेश घेताना ज्या विद्यार्थ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल त्यांनी हे प्रमाणपत्र तीन महिन्यांच्या आत सादर करण्याबाबतचे हमीपत्र १०० रुपयांच्या स्टँप पेपरवर महाविद्यालयात सादर करायचे आहे. या हमीपत्राचा नमुना संचालनालयाच्या www.dte.org.in/fe2013 या संकेतस्थळावर उपल्बध आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 24, 2013 5:26 am