मनसे आक्रमक; प्रयत्न हाणून पाडण्याचा इशारा

रिलायन्स एनर्जी कंपनीने बोरिवली परिसरातील वीज ग्राहकाला गुजराती भाषेत दिलेल्या देयकांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला आहे. मुंबईमध्ये जाणूनबुजून भाषावाद

निर्माण करण्याचा प्रयत्न कुणी करीत असेल तर तो हाणून पाडला जाईल, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

बोरिवली येथील एका रहिवाशाला गेले वर्षभर रिलायन्स एनर्जीकडून गुजराती भाषेतील विद्युत देयक देण्यात येत आहे. ही बाब मनसेचे उपाध्यक्ष नयन कदम यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी थेट रिलायन्स एनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. गुजरात आणि चेन्नईमध्ये मराठी भाषक राहतात, म्हणून तेथे मराठी भाषेतील विद्युत देयके देणार का, असा सवाल नयन कदम यांनी केला आहे.

पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सध्या मराठी विरुद्ध गुजराती भाषक असा वाद निर्माण होऊ लागला आहे. विद्युत देयक गुजराती भाषेत दिल्यामुळे हा वाद विकोपाला जाऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन गुजराती भाषेतून देयके देणे तात्काळ बंद करा, अशी मागणी नयन कदम यांनी केली आहे. मुंबईत अन्य भाषकही राहतात. मग त्यांनाही त्यांच्या भाषेत देयके देणार का, असा सवालही त्यांनी केला.

रिलायन्स एनर्जीकडून ग्राहकांना सोयीसाठी २००५ पासून मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषेमध्ये विद्युत देयके देण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार तात्काळ उपलब्ध भाषेचा पर्याय बदलून दिला जातो.  – प्रवक्ता, रिलायन्स एनर्जी