मुंबई : शहरातील  मेट्रो-१ या मेट्रो रेल्वे सेवेतून आपला हिस्सा विकण्याची हालचाल रिलायन्स इन्फ्राने सुरू केली आहे. ही सेवा सुरू ठेवण्यात होत असणारे नुकसान, तसेच करोनामुळे सेवा बंद असल्याने वाढलेले नुकसान पाहता हिस्सा विकण्यासंदर्भातील पत्र रिलायन्स इन्फ्राने शासनास पाठवले आहे.

मुंबई मेट्रो वन प्रा. लि. (एमएमओपीएल) च्या माध्यमातून शहरात पहिली मेट्रो सेवा घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान २०१४ मध्ये कार्यरत झाली. अत्यंत वर्दळीच्या मार्गावर सुरू झालेल्या या सुविधेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभला.

एमएमओपीएलमध्ये रिलायन्स इन्फ्राचा ६९ टक्के , एमएमआरडीएचा २६ टक्के  आणि पाच टक्के  इतरांचा हिस्सा आहे. मेट्रो १ सेवा सुरू ठेवताना त्याच्या तिकीट दरावर नियंत्रण ठेवण्यात आले. परिणामी दिवसाला ९० लाख रुपये तोटा होत असून तिकीट दर वाढविण्याची मागणी रिलायन्स इन्फ्राने केली होती. पण त्यास मंजुरी मिळाली नाही, तर तिकिटाव्यतिरिक्त अन्य कल्पक स्रोतांचा विचार करण्याबाबत तत्कालीन दर निश्चिती समितीने सुचवले होते.

यावर्षी २२ मार्चपासून मेट्रो सेवा पूर्णत: बंद असल्याने तोटय़ात वाढ होत असून, त्यापूर्वीचा कर्जाचा बोजादेखील एमएमओपीएलवर आहे. त्यातूनच शासनास हे पत्र पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रिलायन्स इन्फ्राकडून अशा संदर्भातील पत्र मिळाल्याबद्दल राज्याच्या नगर विकास विभागाचे मुख्य सचिव भूषण गगराणी यांनी दुजोरा दिला. मात्र त्याबाबत अद्याप कोणतीही चर्चा, कार्यवाही सुरू केली नसल्याचे त्यांनी नमूद केले. या संदर्भात एमएमओपीएल आणि रिलायन्स इन्फ्राने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दुसरीकडे गेल्या महिन्यापासून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो १ मार्गिकेच्या निरीक्षणासाठी स्वतंत्र अभियंत्याच्या नेमणुकीची निविदा काढली आहे. त्या संदर्भातील प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.