News Flash

मुंबईत गुरुवारपासून सुरु होणार बेघर आणि स्थलांतरिसांठी विशेष कॅम्प

येत्या काही दिवसांमध्ये कॅम्पचा विस्तारही करण्यात येणार आहे

धवल कुलकर्णी

करोना व्हायरसचं संकट देशभरात पाय पसरु लागलं आहे. अशात रस्त्यावर वास्तव्य करणाऱ्या बेघरांवर आणि स्थलांतरित मजुरांवर वणवण करण्याची वेळ आली आहे. या सगळ्यांनाच अन्न आणि निवारा मिळणे हे अत्यंत अवघड होऊन बसले आहे. याचाच परिणाम म्हणून लोकांना रस्त्यावर यावं लागतं आहे, खायला अन्न नाही, डोक्यावर छत नाही अशी स्थिती आहे. अशा सगळ्यांना मदत व्हावी म्हणून गुरुवारपासून राज्य शासनाच्या सिव्हिल डिफेन्स विभागाने वर्सोवा येथे एक कॅम्प आयोजित केला आहे. या कॅम्पमध्ये या स्थलांतरितांची, बेघरांची, कामगारांची निवाऱ्याची आणि अन्नाची सोय केली जाणार आहे.

सध्या करोनामुळे देश लॉकडाउन आहे. हातावरचं पोट असलेल्यांना काम राहिलेलं नाही. याचाच परिणाम म्हणून अनेक कामगार शेकडो मैल पायपीट करुन स्थलांतर करताना दिसत आहेत.  करोना चे संकट म्हणजे फक्त सार्वजनिक आरोग्याची निगडित असलेले संकट नाही. तर हे संकट म्हणजे एक मोठी शोकांतिकाच आहे असं म्हटलं पाहिजे. आधीच गरीब आणि त्यात या समस्येने पिचलेल्या वर्गावर करोनाच्या रुपाने वरवंटा फिरला आहे हे निश्चित.

पण मुंबईतील असेच बेघर, रस्त्यावर वास्तव्य करणारे कुटुंब आणि मजुरांसाठी लवकरच राज्य शासनाच्या सिव्हिल डिफेन्स विभागातर्फे आणि स्वयंसेवी संस्थांसाठी वर्सोवा येथे एक विशेष कॅम्प सुरू होत आहे. हा कॅम्प गुरुवार पासून सुरू होईल आणि इथे ठेवण्यात येणाऱ्या मंडळींना अन्न व निवारा मिळेल.

संजय पांडे, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, होमगार्ड अंड सिव्हिल डिफेन्स, त्यांनी लोकसत्ता डॉट कॉम ला सांगितले की डिफेन्स विभागातर्फे हा कॅम्प सुरु करण्यात येणार आहे. सध्याच्या संकटाची दाहकता वाढली तर होमगार्ड विभागाच्या राज्यभर पसरलेल्या जमिनीवर सुद्धा असेच कॅम्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर सुरु करण्यात येतील असंही त्यांनी म्हटलं आहे. बृहन्मुंबई महापालिकेतर्फे या वर्सोवा कॅम्पला पाणी टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे. अन्न आणि इतर वस्तूंचा पुरवठा स्वयंसेवी संस्थांमार्फत करण्यात येईल.

आम्ही साधारणपणे चारशेच्या आसपास माणसांसह हा कॅम्प सुरू करून आणि पुढे त्याची क्षमता साधारणत:  ७०० लोकांच्या आसपास वाढवू असंही त्यांनी म्हटलं आहे. सध्या घाटकोपर आणि दक्षिण मुंबईतील क्रॉस मैदान येथेही काही जमिनी आहेत त्यामुळे येत्या काळात यांचाही वापर या उपक्रमांसाठी होऊ शकतो. या कॅम्पमध्ये रस्त्यावर वास्तव्य करणारी मंडळी, निराधार आणि कुठलाही निवारा नसलेले कामगार आणि मजूर यांना ठेवण्यात येईल.

शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सांगितले या कॅम्पमध्ये स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंग कसोशीने पाळण्यात येईल. इथे राहणाऱ्यांना जुहूच्या इस्कॉन संस्थेतर्फे सिव्हिल डिफेन्स कार्यकर्त्यांमार्फत अन्न पुरवण्यात येईल. विविध दाते व एनजीओ या प्रयत्नात हातभार लावतील. सध्याच्या परिस्थितीमध्ये सरकारी यंत्रणेवर प्रचंड ताण असल्यामुळे अशा मंडळींनी पुढे येऊन लोकांची मदत केली पाहिजे असे चतुर्वेदी यांनी सांगितले.

लॉकडाउन सुरू झाल्यापासून चतुर्वेदी या दिवसाला साधारणपणे  ७ हजार लोकांना जेवण पोहचवण्याची व्यवस्था ‘रोटी घर’ संस्थेमार्फत करत आहेत. आणखी ५ हजार लोकांना जेवण देण्याबाबत इस्कॉन संस्थेने मान्य केले आहे असे त्या म्हणाल्या. वर्सोवा मधल्या या कॅम्प साठी महापालिका व सरकारी यंत्रणांकडून परवानग्या वा मदत मिळवून देण्यासाठी चतुर्वेदी मदत करत आहेत.

सामाजिक कार्यकर्ते अब्राहम मथाई यांनी सांगितले ही बुधवार रात्रीपासून हा कॅम्प सुरू करण्यात येईल आणि गुरुवार पासून येथे लोकांना स्थलांतरित करण्यात येईल. लोकांना वास्तव्य करता यावे म्हणून येथे सतरंज्या ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक सतरंजीच्या मध्ये पाच फुटांचे अंतर राखण्यात आले आहे. इथे राहणाऱ्यांना अन्न, पाणी आणि अंघोळ आणि स्वच्छतागृह यांची सुविधा मिळेल.  हा कॅम्प साधारणपणे २२ हजार स्क्वेअर फुटाच्या परिसरामध्ये लावलेल्या तंबूंमध्ये असेल आणि येत्या काही दिवसांमध्ये या कॅम्पचा विस्तार करण्यात येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2020 5:51 pm

Web Title: relief camp will be start in mumbai for homeless people from this thursday dhk 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 VIDEO: करोनाशी लढणाऱ्यांच्या जिवाशी खेळ: ८० परिचारिकांना केवळ पाच संरक्षित ड्रेस, उपाशीपोटी काम
2 Coronavirus: मनसेच्या माजी आमदाराकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १० लाखाची मदत
3 तळीरामांची तळमळ : “डॉक्टर काहीही करा, मला दारु मिळण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र द्या”
Just Now!
X