झेंडूचा भाव घसरल्याने सामान्यांना दिलासा

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मुंबई-ठाण्यातील फूल बाजारांमध्ये विविध जातीच्या झेंडूच्या फुलांची मोठय़ा प्रमाणावर आवक झाली असून पिवळ्या, केशरी झेंडूने फूल बाजार बहरून गेले आहेत. मोठय़ा प्रमाणावर आवक झाल्यामुळे झेंडूचे दर गडगडले असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईकरांना काही अंशी झेंडू स्वस्तात पदरात पडणार आहे. व्यापाऱ्यांना मात्र त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गणेशोत्सव, दसरा, दिवाळीबरोबरच गुढीपाडव्याला विविध प्रकारच्या फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे निरनिराळ्या फुलांनी फूल बाजार बहरून जातात. गुढीपाडव्यानिमित्त मुंबईमध्ये झेंडूच्या फुलांची मोठय़ा प्रमाणावर आवक सुरू झाली आहे. पुणे, ठाणे, पालघर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पालघर आदी भागांतून मुंबईत मोठय़ा प्रमाणावर झेंडू आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये उत्सवकाळात झेंडूच्या फुलांचे दर वधारत असल्याचे आढळून आले आहे. मात्र यंदा मोठय़ा प्रमाणावर आवक झाल्याने झेंडूचे दर गडगडले आहेत.

एरवी झेंडूची फुले १० ते २० रुपये प्रतिकिलो दराने विकली जातात. मात्र उत्सवकाळात त्यांचे दर दामदुपटीने वाढतात.

आजघडीला भुलेश्वर येथील फूल बाजारात विविध जातीच्या झेंडूंचा प्रतिकिलो दर ४०, ६० आणि ८० रुपयांच्या दरम्यान आहे. त्याच वेळी परळ फूल बाजारातही ४० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने झेंडूची विक्री सुरू आहे. गेल्या वर्षी झेंडूचा प्रतिकिलो दर ६० ते १०० रुपयांदरम्यान होता.

झेंडूच्या किमती कमी झाल्याने ग्राहक खूश असले तरीही दुकानदारांना मात्र काहीसा तोटा सहन करावा लागत आहे. ‘दिवाळीनंतर लागवड कमी झाल्याने आवकही कमी झाली होती. मात्र मार्च महिन्यापासून आवक वाढली आणि कि मती कमी झाल्या. त्या तुलनेत मागणी वाढली नाही, ती स्थिरच राहिली. त्यामुळे बाजार बसला. अगदी काल-परवापर्यंत झेंडूची फुले १०-२० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात होती. गुढीपाडवा असल्याने दोन दिवसांपासून झेंडूची किंमत वाढली आहे. मात्र त्यातून फारसा नफा कमावता येत नाही,’ अशी माहिती भुलेश्वर बाजारातील फूलविक्रेते साईनाथ शिंदे यांनी दिली.

अष्टगंधा झेंडूला मागणी

उत्सवकाळात अष्टगंधा झेंडूला सर्वात जास्त मागणी असते. कारण हा झेंडू आकाराने मोठा आणि उठावदार केशरी रंगाचा असतो. प्रामुख्याने नाशिकहून येणाऱ्या या झेंडूची किंमत ६० रुपये प्रतिकिलो आहे. अष्टगंधाच्या खालोखाल पिवळ्या झेंडूला मागणी असते. पुणे, ठाणे, पालघर, सांगली येथे याचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होते. पिवळ्या झेंडूची किंमत ५० रुपये प्रतिकिलो आहे. सर्वात कमी मागणी कलकत्ता झेंडूला असते. कोल्हापूर, सांगली, सातारा, पालघर, पुणे येथून येणारा हा झेंडू दैनंदिन देवपूजेच्या हारात वापरला जातो. पाडव्याच्या दिवशी मात्र इतर प्रकारच्या झेंडूंच्या तुलनेत त्याला कमी मागणी असते. त्याची किंमत ४० रुपये प्रतिकिलो आहे. याशिवाय काळसर लाल रंगाचा काफरी झेंडूही बाजारात मिळतो. मात्र कमी पाकळ्या असल्याने सणासुदीला त्याला मागणी नसते.

१०-३० रुपये 

झेंडू, आंब्याची पाने असलेल्या एक मीटर लांबीच्या हाराची किमान किंमत

६० रुपये

केवळ झेंडूच्या फुलांच्या हाराचे दर