करोना कालावधीमध्ये जास्तीच्या वीज वापरामुळे आलेल्या वाढीव वीजदेयकांबाबत दिलासा देण्याविषयी चर्चा सुरू असून दिवाळीपर्यंत  हा निर्णय होण्याची शक्यता आहे, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी ट्रॉम्बे येथील टाटा औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. करोना कालावधीमध्ये सतत घरामध्ये राहावे लागल्यामुळे जास्त वीजवापराने अधिकची वीजबिले आली. त्यामुळे या वाढीव वीजबिलांबाबत दिलासा देण्याच्या मागणीनुसार मुंबईसह राज्यातील कोटय़वधी वीजग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने चर्चा सुरू असून दिवाळीपर्यंत गोड बातमी मिळू शकते, असे राऊत म्हणाले.

मुंबई अंधारात जाऊ नये यासाठी १९८१ साली आयलँडिंग यंत्रणेचे काम टाटा पॉवर कंपनीने केले होते. तथापि, १२ ऑक्टोबरला घडलेल्या वीज खंडित होण्याच्या घटनेमुळे अधिक उपाययोजना हाती घेण्याची गरज दिसून येत आहे. वीज खंडित होण्याच्या घटनेच्या कारणांचा शोध घेणे, उपाययोजना करणे यासाठी ऊर्जा विभागाने तांत्रिक लेखापरीक्षण समिती नेमली आहे. तसेच केंद्रीय वीज प्राधिकरण आणि महाराष्ट्र वीज नियामक आयोगानेही (एमईआरसी) स्वतंत्र समित्या नेमल्या असून त्या तिन्हीच्या निष्कर्षांच्या आधारे हाती घ्यावयाच्या उपाययोजनांविषयीची माहिती वीज नियामक आयोगासमोर मांडण्यात येईल. वीजवहन यंत्रणा तसेच मुंबईसाठीच्या आयलँडिंग यंत्रणेमध्ये काय सुधारणा करणे गरजेचे आहे त्याबाबत अभ्यास करण्यात येत असून पुढील वर्षांत आधुनिकीकरणाच्या उपाययोजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही ऊर्जामंत्री म्हणाले. मुंबईची विजेची मागणी २०३० पर्यंत सुमारे ५ हजार मेगावॅटपर्यंत जाण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.

ट्रॉम्बेमध्ये वायूवर आधारित प्रकल्प

ट्रॉम्बे येथील टाटा औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात वायूवर आधारित एक हजार मेगावॉटचा वीजप्रकल्प उभारण्याची तयारी सुरू असल्याची माहिती टाटातर्फे केलेल्या सादरीकरणात नितीन राऊत यांना देण्यात आली. हा प्रकल्प उभारल्यास शहरातच आणखी वीजनिर्मिती होऊन बाहेरून येणारा वीजपुरवठा खंडित झाला तरी संपूर्ण शहर अंधारात जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.