धर्मापासून ते लिव्ह इन रिलेशनशिपपर्यंत आणि ‘आप’च्या विजयापासून ते नेमाडे-रश्दी वादापर्यंत विविध विषयांवर मते मांडत महाराष्ट्राचा वक्ता दशसहस्र्ोषुची अंतिम फेरी मुंबईत रंगली. कसलेल्या नऊ स्पर्धकांनी आपल्या भाषणांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
स्पर्धेची सुरुवात औरंगाबाद विभागातून महाअंतिम फेरीत पोहोचलेल्या आकांक्षा चिंचोलकर हिच्या भाषणाने झाली. तिने ‘धर्म.. राँग नंबर?’ हा विषय मांडला. धर्म ही पवित्र गोष्ट आहे, हे सांगताना तिने स्वामी विवेकानंदांच्या ओळींचा दाखला दिला.
 धर्माच्या नावाखाली झालेली युद्धे, जमिनींची फाळणी, अनेक लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवले आदी मुद्दे तिने मांडले.  त्यानंतर ठाणे विभागातून सवरेत्कृष्ट ठरलेल्या रिद्धी म्हात्रे हिने सध्याच्या तरुणाईलाच नाही, तर समाजालाही महत्त्वाच्या वाटणाऱ्या
‘ल- लग्नाचा की, लिव्ह इनचा?’ या विषयावरच्या आपल्या भाषणाची सुरुवात मंगलाष्टक म्हणत केली. कविता, मंगलाष्टके वगैरेंचा दाखला देत तिने हा विषय फुलवला. विवाहसोहळ्याचे महत्त्व, त्यातील संस्कारांचे महत्त्व मांडत तिने आपल्या विषयाला हात घातला. स्त्री-मुक्ती हा विषय गेल्या अनेक वर्षांपासूनच चर्चेत आहे. मात्र आज, २१व्या शतकात स्त्री-मुक्ती या विषयाकडे आजची तरुणाई कशी बघते याचं प्रत्यंतर नागपूर विभागातून महाअंतिम फेरीत पोहोचलेल्या रसिका चिंचोळे हिच्या भाषणातून आले.
 रत्नागिरी विभागाच्या आदित्य कुलकर्णी या स्पर्धकाने ‘आपच्या विजयाचे वेगळेपण’ हा विषय मांडत श्रोत्यांच्या मनातील भावनांनाही वाचा फोडली. साहित्याच्या क्षेत्राला वाद नवीन नसले, तरी सध्या चाललेल्या ‘नेमाडे-रश्दी’ वादाचे पडसाद केवळ महाराष्ट्रातच नाही, तर विदेशांतही उमटले. या वादाबाबत आपली भूमिका मुंबई विभागातून पहिल्या आलेल्या श्रेयस मेहेंदळे याने मांडली.  
अहमदनगर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कविता देवढे हिने ‘शाळा काय शिकवते’ या विषयावर आपली मते मांडली.
नागपूर विभागातून दोन स्पर्धक महाअंतिम फेरीसाठी निवडण्यात आले होते. त्यापैकी शुभांगी ओक हिने ‘सोशल मीडिया : अभिव्यक्तीचा बहर की कहर?’ हा विषय मांडला. त्यानंतर पुणे विभागातून महाअंतिम फेरीत आलेल्या नेहा देसाई हिने ‘नेतृत्व आणि मराठीपण’ या विषयावर बोलताना सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय नेतृत्व या सर्वच पैलूंवर प्रकाश टाकला.
नाशिक विभागाच्या काजल बोरस्ते हिने ‘बॉलीवूड हे हॉलीवूड का नाही?’ या विषयावर आपली मते मांडली.  
परीक्षकांचे मनोगत..
वक्तृत्वासारख्या महाकलेची रुजवात करणाऱ्या ‘लोकसत्ता’चे आभार. आजच्या पिढीबद्दल, तरुणांबद्दल नकारात्मक बोलले जाते. मात्र, नऊही वक्त्यांनी विविध विषयांवरील त्यांच्या भाष्यातून स्वतला सिद्ध करून दाखवले आहे. सर्व वक्त्यांमध्ये आत्मविश्वास होता. मात्र, त्यासोबतच विचारालाही महत्त्व आहे. एखाद्या विषयात अनेक पायऱ्या खोल गेल्यावर त्यातील अंतर्वरिोध किंवा एकात्मिक सूत्र सापडू शकते. ते व्यक्त करावे अशी अपेक्षा होती. वक्ता हा नट असायला हवा त्याबरोबरच तो खेळाडूही हवा. बोलण्यात कुठे थांबावे, कुठे विश्राम घ्यावा याचा अंदाज त्याला हवा. आजच्या या स्पध्रेनंतर प्रत्येक वक्त्याने त्यांच्या कामगिरीचे विश्लेषण केले असेल. त्यातून त्याने नेमकी किती कामगिरी केली हे त्याच्याही लक्षात येईल. ही स्पर्धा म्हणजे त्यांच्यातील एक उत्तम वक्ता घडवण्याची पायरी आहे हे लक्षात ठेवावे.
– प्राध्यापक विजय तापस  

‘लोकसत्ता’ने अशा प्रकारे चांगले बोलणाऱ्यांना दाद देण्याचा उपक्रम हाती घेतल्याबद्दल अभिनंदन. विषयाची विविधांगीपणे मांडणी करणे अपेक्षित होते. काही स्पर्धकांना विषयाचा आवाका कळलेला नव्हता. नीट अभ्यास न करता केवळ दोन चार मुद्दे हाताशी घेऊन बोलले की विचाराची स्पष्टता जाणवत नाही. मांडणीत गोंधळ उडतो. मांडल्या जाणाऱ्या विषयाचा अभ्यास पक्का व चौकस असायला हवा. मग लक्ष वेधून घेण्यासाठी वेगळ्या तंत्राची गरज भासत नाही. रंगमंचावर सादर करताना नाटकीपणा नाही तर नाटय़ असावे लागते. आवाजाने भान उत्तम हवे मात्र रंगमंचावर आल्यावर अकारण आवाज लावू नये. सहजसंवादाने श्रोत्यांना खिळवून ठेवता येते हे पु. ल. देशपांडे यांच्या वक्तृत्वामधून दिसून येते. देहबोलीचाही विचार हवा. उभे कसे राहता, संबोधन कसे करता याचाही परिणाम समोरच्यावर होत असतो. यासोबतच वक्त्यामध्ये उत्स्फूर्ततेची चुणूक असायला हवी. त्यासाठी कायम सतर्क राहायला हवे. आजुबाजूच्या घटनांमधून प्रेरणा घेत पुस्तकांचा आधार घेत अभ्यास वाढवायला हवा.
सुधीर गाडगीळ, मुलाखतकार

राज्यरातून निवडल्या गेलेल्या स्पर्धकांमधून मला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले, हा माझ्यासाठी मोठा बहुमान आहे. अर्थात या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत पोहोचण्याचा आनंदच माझ्यासाठी मोठा होता. त्यामुळे बक्षिसापेक्षा उत्तम सादरीकरणाकडे माझे लक्ष होते. यासोबतच मला माझ्या वक्तृत्व शैलीबद्दलही बक्षीस मिळाले. पहिल्यांदाच मला माझ्या शैलीबद्दल गौरविण्यात आले आहे. त्यामुळे त्याचे विशेष कौतुक आहे.
– नेहा देसाई, पुणे (प्रथम पारितोषिक आणि  लालित्यपूर्ण शैलीसाठीचे प्रा. वसंत कुंभोजकर पारितोषिक विजेती)

‘लोकसत्ता’ची ‘वक्तृत्व स्पर्धा’ ही आम्हाला उत्तम अनुभवांची शिदोरी देणारी स्पर्धा होती. या निमित्ताने खूप शिकायला मिळाले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या थोर व्यक्तींकडून मार्गदर्शनही मिळाले. त्यासाठी ‘लोकसत्ता’चे आभार. विविध विषय, राज्यभरातून आलेल्या स्पर्धकांची वेगवेगळी शैली या स्पर्धेच्या निमित्ताने अनुभवता आली, त्याचा पुढच्या आयुष्यात नक्कीच उपयोग होणार आहे.
– शुभांगी ओक, नागपूर (द्वितीय पारितोषिक विजेती)

‘लोकसत्ता’मुळे वक्तृत्व स्पर्धेला एक वेगळे वलय मिळाले आहे. त्यामुळे आमच्यासारखे उद्याचे नव्या दमाचे वक्ते तयार होण्यास मदत होणार आहे. जिंकण्यासाठी हवे ते कष्ट घेण्याची माझी तयारी होती. त्यामुळे मिळालेल्या विषयाचा चारही बाजूने विचार आणि अभ्यास केला होता. स्पर्धेत प्रत्येकालाच मिळालेले विषय उत्तम होते आणि बुद्धीला चालना देणारे होते. त्यामुळे स्पर्धा अजूनच चुरशीची झाली.
– काजल बोरस्ते, नाशिक (तृतीय पारितोषिक विजेती)

सर्वात प्रथम आपल्या विभागातून
आलेल्या स्पर्धकांवर मात करत मी अंतिम फेरीमध्ये आलो, हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. या स्पर्धेच्या माध्यमातून वक्तृत्वाचे मूळ सार मांडण्याची संधी आम्हाला ‘लोकसत्ता’ने दिली, त्याबद्दल आभार. या वेळी मिळालेल्या पारितोषिकामुळे पुढच्या स्पर्धाना अधिक जोमाने तयारी करण्याची प्रेरणा मिळाली आहे. पण त्याचबरोबर स्पर्धेतील विषयांवर अभ्यास करताना आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोनही मिळाला.
– आदित्य कुलकर्णी, रत्नागिरी (उत्तेजनार्थ पारितोषिक विजेता)