धर्म माणसांना जोडण्याचे काम करतो, तोडण्याचे नाही. धर्म हा अर्थ आणि काम या पुरुषार्थांची पूर्तता करताना शिस्तीच्या मार्गाने मनुष्याला मोक्षाकडे घेऊन जातो. सृष्टीला परमात्म्याशी जोडणारा धर्मच आहे. कालानुरूप त्याचे नवे रूप आज पहायला मिळते आहे असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.  जगातली सगळी दुःखं दूर व्हावीत, प्रकाश पसरावा यासाठी धर्माचरण केलंच पाहिजे असे सांगणारी आद्य शंकराचार्यांची वैदिक परंपरा आहे. केवळ भारतातच ही परंपरा सांगणारे अनेक महान गुरू सर्व संप्रदायांमध्ये आढळून येतात असंही मोहन भागवत म्हणाले. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

सरसंघचालक म्हणाले की, ” स्वा. सावरकर म्हणाले होते की आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुकांचा आज आदरपूर्वक निषेध नोंदवला पाहिजे. कालानुरूप धर्मात, परंपरांमध्ये चुकीच्या गोष्टींचा अंतर्भाव झाला होता. दांभिकता वाढली होती. आद्य शंकाराचार्यांनी त्याचे खंडन करुन धर्म पुन्हा शुद्ध रुपात विकसित केला. ”

आपण निसर्गाचाच एक भाग आहोत हे विसरलो असल्यानेच आज जगभरात पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या. पूर्वी मात्र भारतात मनुष्याचा निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा कृतज्ञतेचा होता. त्यामुळेच आपण सुमारे एक हजार वर्ष संपूर्ण जगाला अन्नधान्य पुरविले. या काळात कोणाचे शोषण झाले नाही. अर्थव्यवस्था जगभरात प्रथम क्रमांकावर होती, असेही सरसंघचालक म्हणाले.

विलेपार्ले येथील संन्यास आश्रमाच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्रमाचे व्यवस्थापक महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरी होते. यावेळी स्वामी हृदयानंद गिरी, महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती आणि महामंडलेश्वर गुरुशरणानंद यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास आमदार पराग अळवणी, ज्येष्ठ पत्रकार ब्रजमोहन पांडे, राघवेंद्र द्विवेदी, माजी उपमहापौर अरूण देव आदी मान्यवर उपस्थित होते.