अशैक्षणिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना त्रास, सुरक्षेचाही प्रश्न

मुंबई विद्यापीठाच्या निर्नायकी कारभाराप्रमाणे विद्यापीठाच्या कलिना संकुलालाही कुणी वाली नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या शासकीय व्यवस्था, संघटना, राजकीय पक्षांसाठी विद्यापीठाचे हे संकुल हक्काचे मैदान झाले आहे. त्यामुळे इथल्या विस्तीर्ण परिसरात अशैक्षणिक कार्यक्रमांची जंत्री सुरू असते. धार्मिक, सामाजिक कार्यक्रम, जयंती-उत्सवांबरोबरच कधी चक्क वाहनतळ म्हणून विद्यापीठ परिसराचा गैरवापर होत आहे. मात्र या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबत सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होत आहे.

विद्यापीठाच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बाहेरील संघटना, संस्थांचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपच्या मेळाव्यामध्ये बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांच्या बस उभ्या करण्यासाठी परिसराचा वापर करण्यात आला.त्यानंतर शिवयजंती आणि आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांच्या निमित्ताने या परिसरात शोभायात्रा काढण्यात आली. त्यावेळी ढोल-ताशांबरोबर फटाक्यांचाही वापर करण्यात आला. यावेळी इथला परिसर भगव्या आणि निळ्या रंगाच्या झेंडय़ांनी भरून गेला होता. त्यानंतर नुकताच अग्निशमन दलाचा एक कार्यक्रम परिसरात आयोजित करण्यात आला होता.

अशा कार्यक्रमांकरिता विद्यापीठात बाहेरच्या व्यक्ती मोठय़ा संख्येने येतात. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. शिवाय इथली शांतता भंग होते ती वेगळी. अशा कार्यक्रमांमुळे विद्यापीठातील वातावरण बिघडते. परिणामी या कार्यक्रमांना परवानगी देताना विद्यापीठाने विचार करावा, अशी भावना एका प्राध्यापकाने बोलून दाखविली.

विद्यापीठाच्या परिसरात होणाऱ्या कार्यक्रमांना नियमानुसारच परवानगी देण्यात आली आहे. शासकीय कार्यक्रम किंवा सामाजिक हित असेल अशा कार्यक्रमांसाठीच परवानगी देण्यात येते.

डॉ. दिनेश कांबळे,, कुलसचिव, मुंबई विद्यापीठ