News Flash

धर्मस्थळांत उद्यापासून प्रवेश

मुख्यमंत्र्यांची घोषणा, प्रार्थनागृहांमध्ये मुखपट्टी बंधनकारक

करोना टाळेबंदीमुळे आठ महिन्यांपासून बंद असलेली सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे सोमवारपासून उघडण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. दर्शन वा प्रार्थनेच्या वेळी मुखपट्टी वापरणे मात्र बंधनकारक असेल.

करोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपला नसल्याने प्रार्थनागृहांमध्ये गर्दी करणे टाळा आणि स्वत:बरोबर इतरांचेही रक्षण करा, असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

राज्यात मार्चमध्ये करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून धार्मिकस्थळे बंद आहेत. करोनाची परिस्थिती नियंत्रणात येऊ लागल्यानंतर गेल्या जूनपासून टप्प्याटप्प्याने कारखाने, दुकाने, आस्थापना, उपाहारगृहे, चित्रपटगृहे आदींचे व्यवहार कमीअधिक प्रमाणात सुरू करून राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र धार्मिकस्थळे उघडणाऱ्यावरून भाजप तसेच अन्य संघटनांनी राज्यभर आंदोलने करून सरकारवर दबाव आणला होता. मंदिरे उघडण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यातील पत्रवादही गाजला होता. मात्र नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून प्रार्थनास्थळे उघण्याबाबत आजवर कठोर भूमिका घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर सर्व धार्मिक स्थळे उघण्याची घोषणा केली.

दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर करोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. करोना हा राक्षसही हळूहळू माघार घेत असला तरी बेसावध राहून चालणार नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

करोनाकाळात नागरिकांनी शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर अन्य धर्मीयांनीही ईद आणि माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळली, असे गौरवोद्गार काढून, धार्मिक स्थळे उघडणे हा फक्त सरकारी आदेश नसून ती ‘श्रीं’ची इच्छा असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

करोनाकाळात सर्वच प्रार्थनास्थळे बंद होती, परंतु डॉक्टर, परिचारिका- परिचारक यांच्या रूपाने देव भक्तांची काळजी वाहत होता. देव आपल्यातच होता, असे मुख्यमंत्री म्हणाले. पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र नियम, शिस्तीचे काटेकोर पालन सर्वाना करावेच लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

शिस्तपालन आवश्यक

* प्रार्थनागृहांतील गर्दी टाळण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

* प्रार्थनास्थळांमध्ये मुखपट्टी वापरणे सक्तीचे

* प्रार्थनास्थळांमध्ये शिस्त पाळणे आवश्यक

* धार्मिक स्थळांबाबतची सविस्तर मार्गदर्शक सूचना लवकरच

* मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन अनिवार्य

हे अद्याप बंदच

* सर्वसामान्यांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा

* राजकीय सभा. सार्वजनिक कार्यक्रम

* शाळा (नववी ते बारावीचे वर्ग २३ तारखेला सुरू होणार, पण अन्य वर्ग बंद)

* मैदानांवरील जाहीर कार्यक्रम. सर्वसामान्यांसाठी तरण तलाव

ज्येष्ठ नागरिक, बालके, गर्भवतींना प्रवेशबंदी

प्रार्थनास्थळे सुरू होत असली तरी त्यांत ६५ वर्षांवरील नागरिक, १० वर्षांखालील मुले, व्याधीग्रस्त तसेच गर्भवतींना प्रवेश देऊ नये किंवा त्यांनी तेथे जाणे टाळावे, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

रेल्वेबाबत गोंधळ

मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेत सर्वसामान्यांना प्रवासाची मुभा द्यावी, असा प्रस्ताव राज्य सरकारने रेल्वेला सादर केला असला तरी रेल्वेने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंबईतील रेल्वे सेवेत साधारणपणे क्षमतेच्या चौपट गर्दी होते. अशा वेळी सामान्यांना प्रवासमुभा दिल्यास करोनाचे संकट वाढण्याची भीती आहे. त्यामुळेच रेल्वेने अद्याप परवानगी दिलेली नाही. दिवाळीनंतर रुग्णांची संख्या लक्षात घेऊनच निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात येते.

करोना विषाणू संसर्गाचा धोका संपला नसल्याने प्रार्थनास्थळांमध्ये गर्दी करणे टाळा आणि स्वत:बरोबर इतरांचेही रक्षण करा.

– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2020 12:17 am

Web Title: religious places open from tomorrow abn 97
Next Stories
1 करोना लशीच्या प्राधान्य यादीपासून अंगणवाडी सेविका दूरच
2 १३८ कोटींची पाणीपट्टी थकबाकी वसूल
3 वाहन नोंदणीतून ९० टक्के महसूल
Just Now!
X