‘मला गद्दार म्हणत मला पाकिस्तानात जाण्यास सांगितले. मला अर्थात दु:ख झालं. परंतु जातीय किंवा धार्मिक हिंसेच्या घटनांमधील पीडितांना खूप सहन करावे लागले आहे. त्यांच्या दु:खापुढे माझे दु:ख काहीच नाही. मी त्यांच्या हिमतीला दाद देतो,’ अशा भावना ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी रविवारी व्यक्त केल्या.

भारतीय लोकशाही युवा संघटनेतर्फे (डीवायएफआय) आयोजित परिषदेत जातीय किंवा धार्मिक हिंसाचाराचे बळी ठरलेल्या कुटुंबांच्या अनुभव कथनानंतर शहा यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ‘देशभरातील वाढत्या झुंडबळीच्या घटना आणि द्वेषाचे राजकारण’ या विषयावर ही परिषद झाली.

‘गेल्या पाच वर्षांपासून मी न्यायासाठी झगडतो आहे, मात्र नितीनला अजूनही न्याय मिळत नाही.   सर्वच सरकारी यंत्रणांची हातमिळवणी असल्याची जाणीव पदोपदी होत आहे,’ अशी वेदना नगर येथे जातीय विद्वेषातून खून झालेल्या नितीन आगे या अल्पवयीन मुलाचे वडील राजू आगे यांनी व्यक्त केली. हरियाणा येथे रेल्वेत सामूहिक हिंसेचा बळी ठरलेल्या जुनैद खान यांचे कुटुंबीय मोहम्मद नफीस आणि मोहम्मद कासम यांनीदेखील त्यांचा अनुभव सांगितला. ‘माझ्या सोळा वर्षांच्या भावाची टोळक्याने चाकूने वार करून हत्या केली. त्यावेळी रेल्वेत बरेच लोक उपस्थित होते. त्यातील एकही व्यक्ती पुढे आली नाही.   देशातील जनता सरकार निवडून देते. त्यामुळे सरकारने फक्त एका समुदायासाठी अथवा धर्मासाठी काम न करता सर्वाच्या हक्कासाठी काम करावे हे संविधानात अपेक्षित आहे, असे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती गोपाल गौडा यांनी स्पष्ट केले.