रिपब्लिकन पक्षात वाटेल त्याला पदांची खिरापत वाटण्यात येत असल्याने जुन्या- निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. रामदास आठवले यांनी बुधवारी कांतीकुमार जैन यांची कार्याध्यक्षपदी निवड जाहीर केल्याने कार्यकर्ते संतापले आहेत. विशेषत: पाच दिवसांपूर्वीच या पदावर निवड करण्यात आलेले बाबूराव कदम व त्यांचे समर्थक नाराज झाले आहेत.  
८ नोव्हेंबरला झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत नागपूरचे भूपेश थुलकर यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. बाबूराव कदम यांच्यावर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. तर राजा सरवदे यांची सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली.
मात्र बुधवारी अचानक आठवले यांनी पत्रकार परिषद घेऊन कांतीकुमार यांची कार्याध्यक्षपदी निवड केल्याचे जाहीर केले. कदम हेही कार्याध्यक्ष असतील असे सांगितले. पक्षात ६० टक्के दलित व बौद्ध आणि ४० टक्के दलितेतरांना पदे देण्याचा धोरणात्मक निर्णय आहे, त्यानुसार इतर समाजातील कार्यकर्त्यांना महत्त्वाची पदे देण्यात आल्याचे आठवले यांनी सांगितले.  मात्र काही नाराज कार्यकर्ते राजीनामे देण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
रिपाइंला ‘जशास तसे’ उत्तर -मुख्यमंत्री
डॉ. आंबेडकरांच्या इंदू मिलमधील स्मारकाच्या उभारणीसाठी निविदा काढण्याची, आरेखनाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या वर्षभरापूर्वी राज्य सरकारच्याच माध्यमातून ही जागा केंद्राकडून मिळाली. त्यामुळे ‘आम्हीच स्मारकाचे भूमिपूजन करू’ असा दावा कुणीही करू नये, अशा शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण यांनी नवी दिल्लीत बोलताना रिपाइंला सुनावले. रिपाइंच्या आंदोलनाच्या इशाऱ्याबद्दल विचारले असता त्यांना जशास तसे उत्तर देण्याचे सूतोवाचही चव्हाण यांनी केले.