भक्ती बिसुरे

पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. इंजेक्शन मिळवण्यासाठी नागरिक जिवाच्या कराराने प्रयत्न करत आहेत. मात्र, रेमडेसिविर इंजेक्शन हे जीवरक्षक औषध नाही. रेमडेसिविरमुळे रुग्णांचा मृत्यू थांबवता येत नाही, त्यामुळे त्यासाठीची धावपळ अनाठायी आहे असे राज्य करोना कृती दलाने स्पष्ट के ले आहे.

जगभरामध्ये रेमडेसिविर औषध करोना रुग्णांवर किती उपयुक्त ठरते याबाबत चाचण्या (रँडमाईज्ड कं ट्रोल्ड ट्रायल) सुरू आहेत. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांपासून ते गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांपर्यंत सर्व प्रकारातील रुग्णांचा या चाचण्यांमध्ये समावेश आहे. मात्र, रुग्णालयात दाखल रुग्णांचा रुग्णालयातील मुक्काम एक ते तीन दिवसांपर्यंत कमी करण्याव्यतिरिक्त रेमडेसिविरचा कोणताही उपयोग दिसून आला नसल्याचे राज्य करोना कृती दलाने स्पष्ट के ले आहे.

राज्य करोना कृती दलाचे प्रमुख डॉ. संजय ओक म्हणाले, की  रेमडेसिविर हे विषाणुविरोधी औषध आहे. विषाणूंच्या वाढीला अवरोध करणारे हे औषध रुग्णाला संसर्ग झाल्यानंतर दुसऱ्या ते नवव्या दिवसापर्यंतच वापरायचे आहे. दहाव्या दिवसानंतर औषधाचा कोणताही उपयोग होत नाही. सहा मात्रांनंतर हे औषध निरुपयोगी आहे. हे औषध जीवरक्षक नाही. हे औषध दिले नाही तर रुग्ण वाचणार नाही असे नाही, हे रुग्णांच्या नातेवाईकांनी लक्षात ठेवावे. करोना रुग्णाला बरे करण्यासाठी ऑक्सिजनसह इतर औषधोपचारांचाही उपयोग होतो आणि रुग्ण बरे होतात, असे डॉ. ओक यांनी स्पष्ट के ले आहे.

डॉ. शशांक जोशी म्हणाले, ‘रुग्णाची वैद्यकीय परिस्थिती पाहून त्यानंतर त्याच्यावर रेमडेसिविर वापरण्याची परवानगी डॉक्टरांना आहे. पहिल्या नऊ दिवसांपर्यंत रेमडेसिविर औषध दिल्यास उपयोग होतो, त्यानंतर करोना रुग्णांवर त्याचे सकारात्मक परिणाम दिसत नाहीत. रेमडेसिविर हे घरी घेण्याचे औषध नाही. ते कटाक्षाने डॉक्टरांच्या निरीक्षणाखालीच घेतले जाणे आवश्यक आहे. कोविडमध्ये त्याचा वापर के वळ प्रायोगिक तत्त्वावर होत आहे. रेमडेसिविर ही जादूची कांडी नाही. योग्य वेळी, शक्य तेवढ्या तातडीने आजाराचे निदान होणे, ऑक्सिजन आणि पालथे झोपणे या बाबींनीच करोना रुग्णाला अधिकाधिक गुण येणार आहे, हे नागरिकांनी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.’

जागतिक पातळीवर रेमडेसिविर इंजेक्शनच्या आतापर्यंत चार चाचण्या (रँडमाईज्ड कं ट्रोल्ड ट्रायल) करण्यात आल्या आहेत. चारपैकी तीन चाचण्या ऑक्सिजनवर नसलेले रुग्ण, कमी प्रमाणात ऑक्सिजनवर असलेले रुग्ण आणि कृत्रिम श्वासोच्छवासावर असलेले रुग्ण अशा तीन गटांवर करण्यात आल्या आहेत. उर्वरित एक चाचणी ही अत्यंत सौम्य लक्षणे असलेले किं वा लक्षणे नसलेले रुग्ण अशा गटावर करण्यात आली आहे. कोणत्याही गटातील चाचण्यांमध्ये रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी हे इंजेक्शन उपयुक्त नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सौम्य लक्षणे किं वा लक्षणे नसलेल्या करोना रुग्णांवर रेमडेसिविरचा काहीही उपयोग झाला नसल्याचे चाचणीअंती निष्पन्न झाले आहे. इतर तीन चाचण्यांमध्येही तेच स्पष्ट झाले आहे, असा निर्वाळा डॉ. जोशी यांनी दिला.

रेमडेसिविर दिले नाही तर रुग्ण वाचणार नाही असे नाही, हे रुग्णांच्या नातेवाईकांनी लक्षात ठेवावे.

– डॉ. संजय ओक, अध्यक्ष, राज्य करोना कृती दल

रेमडेसिविर ही जादूची कांडी नाही. योग्य वेळी, शक्य तेवढ्या तातडीने आजाराचे निदान होणे, ऑक्सिजन आणि पालथे झोपणे या बाबींनीच करोना रुग्णाला अधिकाधिक गुण येणार आहे, हे नागरिकांनी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

– डॉ. शशांक जोशी, सदस्य,  राज्य करोना कृती दल