20 November 2019

News Flash

‘केसरबाई’चा धोका कायम

केसरबाईची नोंद शासनदरबारी ‘२५ सी’ या नावाने आहे. ही मूळ केसरबाई ९० वर्षे जुनी आहे.

(संग्रहित छायाचित्र)

जयेश शिरसाट

कोसळलेल्या इमारतीचा उर्वरित भाग धोकादायक; अग्निशमन दल, पोलिसांचा इशारा

डोंगरीतील दुर्घटनाग्रस्त केसरबाई इमारत आणि तिला खेटून उभ्या अन्य इमारतींवरील संकट अद्याप टळलेले नाही. केसरबाई शेजारील अवैध तीन मजली इमारतीचा निम्मा भाग मंगळवारी कोसळून १३ जणांचा मृत्यू झाला. या इमारतीचा निम्मा भाग अद्यापही उभा आहे. हा निम्मा धोकादायक भाग पाडावा, अन्यथा मनुष्यहानी होईल, अशी सूचना अग्निशमन दल, डोंगरी पोलिसांनी  महापालिका, म्हाडा प्रशासनाला केली.

केसरबाईची नोंद शासनदरबारी ‘२५ सी’ या नावाने आहे. ही मूळ केसरबाई ९० वर्षे जुनी आहे. दोन वर्षांपूर्वीच ही चारमजली इमारत धोकादायक ठरवून रिकामी करण्यात आली. मात्र ही मूळ इमारत अद्यापही भक्कम स्थितीत आहे. २० वर्षांपूर्वी केसरबाई इमारतीच्या मागील बाजूस त्याला खेटून अनधिकृत इमारत उभी राहिली. याच इमारतीचा मोठा भाग मंगळवारी कोसळला. महापालिका आणि म्हाडापाठोपाठ विश्वस्तांनीही ही इमारत आपली नाही, अशी भूमिका घेतली आहे.

या अनधिकृत इमारतीचा अर्धा भाग शाबूत असला तरी तो धोकादायक अवस्थेत आहे. तपासाशी संबंधित एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दलेल्या माहितीनुसार हा भागही खिळखिळा झाला आहे. मुसळधार पावसाच्या माऱ्याने कोणत्याही क्षणी कोसळू शकतो. या इमारतीच्या चहूबाजूने इमारती आहेत. येथे पादचाऱ्यांचीही वर्दळ असते. अशात हा भाग कोसळला तर आणखी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. डोंगरी पोलिसांनी महापालिका आणि म्हाडा या दोन्ही यंत्रणांना निम्मा भाग पाडण्याबाबत पत्राद्वारे कळवले आहे. पोलिसांनी कोसळलेल्या इमारतीसमोरील तांडेल क्रॉस लेनवर दुतर्फा बॅरिकेड्स लावून पादचाऱ्यांची वर्दळ थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र गुरुवारीही येथे बघ्यांची गर्दी होती.

दरम्यान, अग्निशमन दलाने मंगळवारीच महापालिकेच्या विभाग कार्यालयाला उरलेला निम्मा भाग धोकादायक असल्याबाबत कळवले आहे. आसपासच्या इमारती रिकाम्या करून निम्मा भाग तातडीने पाडावा, अशी सूचना दलाने केली आहे. या माहितीला अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे यांनी दुजोरा दिला. हा निर्णय विभाग कार्यालय पातळीवर घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

म्हाडाने हात झटकले

अवैध बांधकाम पाडण्याचा अधिकार म्हाडाला नसून महापालिकेला आहे. केसरबाई इमारतीशेजारील पडलेल्या अवैध इमारतीचा भाग शिल्लक असेल तर त्याबद्दल म्हाडाकडून पुन्हा महापालिकेला कळवले जाईल. कोसळलेली इमारत म्हाडाच्या अखत्यारित नाही. त्यामुळे उरलेला निम्मा भाग पाडण्याचे काम महापालिकेलाच करावे लागेल, अशी प्रतिक्रिया मुंबई गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी दिली, तर महापालिकेच्या ‘बी’ विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विवेक राही यांच्याशी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.

First Published on July 19, 2019 1:23 am

Web Title: remaining part of the damaged kesarbai building is dangerous abn 97
Just Now!
X