दहा महिन्यांच्या खंडानंतर ऐरोलीतील मैदानावर सुरुवात

मुंबई : क्षणात इकडच्या झुल्यावरून हवेत उसळून गिरकी घेत दुसऱ्या झुल्यावर जाणे, मृत्युगोलातील तुफान वेगाने फिरणाऱ्या दुचाकीचा थरार, सर्वत्र रंगीबेरंगी दिव्यांचे प्रकाशझोत आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट अनुभवणारा सर्कशीचा तंबू तब्बल दहा महिन्यांनंतर पुन्हा एकदा झगमगणार आहे. करोना टाळेबंदीपासून बंद असलेली सर्कस नवीन वर्षांत नव्या दमाने येत असून ऐरोली येथे रॅम्बो सर्कस १ जानेवारीपासून खेळ सुरू करत आहे.

Tesla chief, Elon Musk, electric car, investment, india
‘टेस्ला’कडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक? एलॉन मस्क यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज
Retail inflation hit a five month low of 4.85 percent in March
किरकोळ महागाई दर ४.८५ टक्के; पाच महिन्यांच्या नीचांकी घसरण
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
pune city, sales of electric vehicles, last year, Gudi Padwa festival
पुणे : कुणी इलेक्ट्रिक वाहन घेता का? गेल्या वर्षीपेक्षा पाडव्यानिमित्त विक्रीत तब्बल ८५ टक्क्यांची घट

कोणत्याही गावात ४५ दिवसांपेक्षा अधिक काळ न थांबणारी सर्कस करोनामुळे तब्बल दहा महिने ऐरोलीत अडकून पडली होती. फेब्रुवारीच्या अखेरीस ही सर्कस नवी मुंबईत दाखल झाली. मार्चच्या पहिल्या आठवडय़ात मोठय़ा उत्साहाने सुरुवातदेखील झाली, पण करोनामुळे सर्व काही ठप्प झाले.

रॅम्बो सर्कशीतील कलाकार देशाच्या वेगवेगळ्या भागांतील आहेत. टाळेबंदीत सुरुवातीला ते सर्कशीच्या तंबूत वास्तव्य करून होते, मात्र शिथिलीकरणात अनेकांनी मूळ गावाची वाट धरली. सर्कशीला परवानगी मिळण्याची शक्यता दिसू लागली तसे अनेकांना परत बोलविण्यात आले आणि आता नव्या उत्साहाने पुन्हा सुरुवात करत असल्याचे, रॅम्बो सर्कसचे मालक सुजित दिलीप यांनी सांगितले. टाळेबंदीत ऐरोली आणि परिसरातील अनेकांनी, शासनाने खूप सहकार्य केल्यामुळेच आज नव्याने सर्कस सुरू करणे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.

टाळेबंदीत अधूनमधून कसरतींचा सराव सुरू होता. पण रोजच प्रकाशझोतात राहणारे आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवणारे हे कसरतपटू, कलाकारदेखील हताश झाले होते. दरम्यान, ऑनलाइन तसेच अन्य डिजिटल माध्यमांतून सर्कसीतील चित्रीकरण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे प्रयत्न झाले. नुकतेच पृथ्वी थिएटरमध्ये असा एक खेळदेखील दाखविण्यात आला, तर एका दाक्षिण्यात चित्रपट कंपनीच्या सहकार्याने चित्रपटगृहात पडद्यावर हे खेळ दाखविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे कसरतपटूंमध्ये पुन्हा उत्साह आल्याचे सुजित यांनी सांगतिले.

खेळादरम्यान अनेकदा विदूषक हे लहान मुलांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी खेळतात, धम्माल करतात. पण आता तसे करणे कठीण असल्याने हातमोजे वगैरे वापरून काही पर्याय काढता येईल का, यावर विचार सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

करोनापूर्व काळात या सर्कशीत सुमारे १०० कसरतपटू, कलाकार आणि इतर कर्मचारी होते. मात्र त्यातील परदेशी कसरतपटू पुन्हा आपल्या देशांत गेले असून, त्यांना सध्या भारतात येणे शक्य नाही. तसेच मणिपूर, पश्चिम बंगाल अशा काही ठिकाणच्या सहायक कर्मचाऱ्यांना रेल्वे तिकीट मिळण्यात अडचणी असल्याने सध्या एकूण ६० कसरतपटू, कलाकारांच्या संचासह नवीन खेळ सुरू होईल. काही कसरतपटूंना विमानाने आणल्याचे त्यांनी सांगितले.

सर्कशीचे खेळ सुरू असतात तेव्हा दिवसाला सुमारे एक लाख रुपये खर्च होतो, तर खेळ नसतात तेव्हा २५ हजार रुपये लागायचे. गेल्या दहा महिन्यांत भरपूर मदत मिळाली, पण परदेशी प्रवाशांचे परतीचे प्रवास आणि सर्कशीतील साधनांची देखभाल-दुरुस्ती यामुळे तीस लाख रुपये खिशातून खर्च करावे लागल्याचे सुजित यांनी सांगितले.

करोनामुळे होणारे बदल

’ आसनव्यवस्था दोन हजारांवरून तीनशेवर.

’ सर्व आसनांचे वारंवार निर्जंतुकीकरण.

’ तिकिटे ऑनलाइनदेखील उपलब्ध.