News Flash

मुंबईत ‘रेमडेसिवीर’चा काळा बाजार, मेडिकलमधून पोलिसांनी जप्त केले २५० पेक्षा जास्त इंजेक्शन

एकीकडे राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असताना काळा बाजार होत असल्याचं समोर

(संग्रहित छायाचित्र)

राज्यात करोनाचा उद्रेक होत असताना लसीसोबतच रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन दुप्पट करावे तसेच काळा बाजार होऊ नये म्हणून अधिकतम किरकोळ किंमत (एमआरपी) कमी करावी, अशी सूचना आरोग्यमंत्री टोपे यांनी उत्पादकांना गुरूवारी केली. पण त्यानंतरही या इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याचं समोर आलं आहे. मुंबईत एका मेडिकलमधून पोलिसांनी साठवलेले २७२ रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केले आहेत.

मुंबई मिररच्या वृत्तानुसार, जोगेश्वरीच्या जी.आर. फार्मा या मेडिकल दुकानात जवळपास २७२ रेमडेसिवीर इंजेक्शन साठवण्यात आले होते. काळा बाजार करण्याच्या हेतूने हे इंजेक्शन इथे ठेवले होते. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली असून सखोल तपास सुरू केला आहे. तर, जप्त केलेले इंजेक्शन प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांवर उपचारासाठी विविध रुग्णालयांमध्ये पाठवण्यात येणार आहेत.

आणखी वाचा- “माझ्या आईला अर्जंट रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज”, ठाण्यातील तरुणीने ट्विट करताच…

यापूर्वी गुरूवारीही अंधेरीमधून सर्फराज हुसेन नावाच्या एका २२ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून १२ रेमडेसिवीर हस्तगत करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला टीम मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. हस्तगत केलेले इंजेक्शन तो कोणाला पुरवणार होता याबाबत अद्याप तपास सुरू आहे.

दरम्यान, राज्यात जाणवणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी या इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या सात कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या इंजेक्शनचे उत्पादन दुप्पट करावे तसेच काळा बाजार होऊ नये म्हणून अधिकतम किरकोळ किंमत (एमआरपी) कमी करावी, अशी सूचना आरोग्यमंत्री टोपे यांनी उत्पादकांना केली. राजेश टोपे यांनी यावेळी रेमडेसिवीरचा वापर प्रोटोकॉलनुसार करा असं आवाहन खासगी डॉक्टरांना करत ११०० ते १४०० च्या वर विकू नये अशी विनंती केली. तसंच त्याची साठेबाजी करु नका असंही म्हणाले. राज्याला सध्या दररोज ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. सध्याची वाढती रुग्णसंख्या पाहता एका अंदाजानुसार एप्रिलअखेर दिवसाला किमान दीड लाख इंजेक्शनची आवश्यकता भासू शकते. त्यासाठी उत्पादन दुप्पट करावे. कंपन्यांनी वाढीव उत्पादनाला सुरुवात केली असून त्याची प्रक्रिया पूर्ण होऊन नविन उत्पादन यायला किमान २० दिवस लागतील. त्यानंतर राज्यात त्याचा तुटवडा जाणवणार नाही. सध्या राज्यातील तुटवड्याची स्थिती लक्षात घेऊन काही कंपन्यांनी आयात करण्यासाठी ठेवलेला साठा महाराष्ट्राला देण्याचे मान्य केले आहे. मात्र पुढील काही दिवस इंजेक्शनच्या वापरावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे, असे टोपे यांनी सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 11:56 am

Web Title: remdesivir black marketing in mumbai over 250 injections recovered two held sas 89
Next Stories
1 मुंबईत फक्त एक दिवसाचा लसीचा साठा शिल्लक; महापौरांची माहिती
2 ‘Ambassadors of Mumbai’ व्हायचंय? खाकी टूर्स देत आहे संधी
3 सुप्रीम कोर्टाने अनिल देशमुखांना झटका दिल्यानंतर सीबीआय तपासाला वेग; टीम NIA कार्यालयात दाखल
Just Now!
X