महाराष्ट्रातच नव्हे, तर देशाच्या विविध भागात करोनानं उद्रेक केल्यानंतर रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मागणीत प्रचंड वाढ झाली. तर दुसरीकडे उत्पादन मंदगतीने सुरू असल्यानं तुटवडा निर्माण झाला आहे. याचा फायदा घेत काही जण रेमडेसिवीरचा काळाबाजार करत असल्याचं उघडीस आलं. त्यामुळे प्रशासन आणि पोलिसांकडून काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध विविध ठिकाणी मोहीम सुरू आहे. असं असताना रेमडेसिवीरची चक्क OLXवरून विक्री सुरू असल्याचं समोर आलं आहे.

‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनीने यासंदर्भातील विशेष वृत्त प्रसिद्ध केलं आहे. देशातील विविध राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत असतानाच ‘ओएलएक्स’वर रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वृत्तवाहिनीने याची पडताळणी केली. त्यावर हे सत्य असल्याचं समोर आलं. महाराष्ट्र आणि गुजरातमधील व्यक्तींकडून याची विक्री होत असल्याचं दिसलं.

‘ओएलएक्स’वर रेमडेसिवीर इंजेक्शन विक्रीच्या जाहिराती दिसून आल्या. धक्कादायक बाब म्हणजे हे इंजेक्शन काहीजण ५ ते ६ रुपयांना विकत आहेत. अंधेरीतील एका व्यक्तीने ओएलएक्सवर रेमडेसिवीर विक्रीची जाहिरात पोस्ट केलेली होती. त्या व्यक्ती संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र, त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

दुसरी व्यक्ती गुजरातमधील आहे. सत्यम असं खातेधारकाचं नाव असून, त्याने रेमडेसिवीर इंजेक्शन विक्रीस असल्याची पोस्ट केलेली आहे. या इंजेक्शनची किंमत १,४०० ते १,६०० इतकी आहे. नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे रेमडेसिवीर हे असं औषध आहे, जे ओएलएक्सवर विकण्यास परवानगी नाही.

अनेक ठिकाणी रेमडेसिवीर जप्त

रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्यानंतर महाराष्ट्रातही रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला. मागणी वाढताच इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना दहा-दहा तास रांगेत ताटकळत उभं राहावं लागत आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने अनेक ठिकाणी कारवाया केल्या आणि रेमडेसिवीर जप्त केलं होतं. मात्र, हा काळाबाजार अद्यापही थांबला नसल्याचं दिसत आहे.