सार्वजनिक ठिकाणी, विजेच्या खांबांवर, बाजारपेठांच्या ठिकाणी लावण्यात आलेले अनधिकृत जाहिरात फलक उतरवले गेले नाहीत, तर आता महापालिकेच्या अधिका-यांवरच कारवाई होणार आहे. वारंवार आदेश देऊनही त्याचे पालन न केल्यामुळे संतप्त झालेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी येत्या चोवीस तासांत अनधिकृत जाहिरात फलक काढून टाकण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिलेत.
पुढील २४ तासांत सर्व अनधिकृत जाहिरात फलक उतरवून, त्यावरील फोटोंची ओळख पटवून संबंधित व्यक्तींना नोटीस पाठवण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला. तसेच दिलेल्या मुदतीत हे काम न केल्यास संबंधित अधिका-यांवर कारवाई करण्यात येईल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.