09 August 2020

News Flash

‘पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात ठसा उमटवणारा उदारमतवादी लेखक हरपला’

सर्वोदय वाचकांच्या अंत:करणाला पाझर फोडणारा लेखक

Arun sadhu : अरुण साधू यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारिता, साहित्य व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी दु:ख व्यक्त केले आहे.

ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध साहित्यिक अरुण साधू यांचे सोमवारी पहाटे मुंबईत निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. कालपासून मुंबईतील सायन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठीसह इंग्रजी पत्रकारितेत अमूल्य योगदान देणार्‍या अरुण साधू यांनी मराठी साहित्यातही अफाट मुशाफिरी केली. कथा, कादंबरी, ललित, चरित्र, वैचारिक लेखन, भाषांतर अशा साहित्याचे विविध प्रकार हाताळत, प्रत्येक प्रांतात त्यांनी आपल्या लेखनाची छाप पाडली. अरुण साधू यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारिता, साहित्य व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी दु:ख व्यक्त केले आहे.

अरूण साधू यांच्या जाण्याने पत्रकारितेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या येण्यापूर्वी पत्रकारितेत ललित लेखन म्हटले की, संबंधित विषयाची कोरडेपणाने मांडणी केली जात असे. मात्र, वार्ताहराला किंवा पत्रकाराला ललित लेखनाचे अंग असले की किती उत्तम साहित्यनिर्मिती होऊ शकते, हे साधूंनी दाखवून दिले. राजकारण हा पत्रकारांच्या दैनंदिन जगण्याचा भाग असतो. मात्र, त्याला कल्पनेची डुब दिली तर चांगली साहित्यनिर्मिती होऊ शकते, हे त्यांच्या लिखाणाने सिद्ध केले. समाजवादी चळवळ, त्यानंतर मध्यमवर्ग पसरत जाण्याचा काळ अशा विस्तृत कालपटलावर त्यांनी राजकीय लिखाण केले.
गिरीश कुबेर, संपादक, लोकसत्ता

एक साधा, आक्रस्ताळा आणि टीकाखोर लेखक नसूनही अरूण साधू यांनी स्वत:च्या राजकीय लिखाणाने इतरांमध्ये स्वत:बद्दल आदर निर्माण केला. त्यांनी अनेक वर्षे पत्रकारिता केली. या काळात संपादक पदावर नसतानाही ते कुठल्याही संपादकापेक्षा मोठे ठरले. त्यांनी केलेले राजकीय लिखाण आजच्या काळातही मार्गदर्शक आहे. याशिवाय, त्यांनी आपल्या साहित्यामधून गरिबांच्या वाट्याला येणारे भीषण वास्तव मांडून सर्वोदय वाचकांच्या अंत:करणाला पाझर फोडला. ते एक संवेदनशील पत्रकार, एकेकाळी महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवणारे चतुरस्त्र प्रतिभेचे लेखक होते.
सुरेश द्वादशीवार, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक

 

अरूण साधू यांनी ‘माणूस’मधून राजकीय, साम्यवादी चळवळ आणि चीनमधील घडामोडी अशा विविधांगी विषयांवर लिखाण केले. त्या काळात इतके वैविध्यपूर्ण करणारे लेखक नव्हते. त्यामुळे अरूण साधू तरूणांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्यामध्ये तीव्र सामाजिक जाणीव होती. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही त्यांची दैवतं होती. याशिवाय, त्यांना कार्ल मार्क्सच्या विचारांबद्दलही आकर्षण होते. त्यांनी आपल्या पत्रकारितेमधून नेहमीच तत्वज्ञान आणि दलितांसंबधीचे विषय हाताळले.
कुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार

पत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात ठसा उमटवणारा उदारमतवादी लेखक असं अरूण साधू यांचं वर्णन करावं लागेल. त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक साहित्यप्रकार हाताळले. त्यांची ‘स्फोट’ ही कादंबरी विज्ञानपर लेखनाचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. याशिवाय, त्यांनी तत्कालीन चीनविषयी केलेले लिखाणही महत्त्वाचे ठरले. त्यांनी पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाला वेगळा चेहरा प्राप्त करून दिला. त्यामुळे त्यांच्या जाण्याने मोठे नुकसान झाले आहे.
सदानंद मोरे, सामाजिक अभ्यासक

‘ग्रंथाली’त असल्यापासून आमचा परिचय होता, नंतरच्या काळात ते माझे स्नेही झाले. शिल्पकला, साहित्य, राजकारण, पॉटरी अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात त्यांना रस होता. त्यांनी नेहमीच नव्या विषयांवर आणि नव्या फॉर्ममध्ये लेखन केले. तरूण मुलांना शिकवायला त्यांना खूप आवडायचे. एका साधा, सरळ आणि केव्हाही मार्गदर्शन करण्यास उपलब्ध असणारी व्यक्ती म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो. आमच्या मैत्रीचा २५ वर्षांचा काळ खूप सुंदर होता. त्यांच्या जाण्याने माझे खूप मोठे वैयक्तिक नुकसान झाले आहे.
संजीव खांडेकर

पत्रकारिता व साहित्य या दोहोंमधलं भान सजगपणे जपणाऱ्या अरुण साधू यांच्या निधनाने एक पर्वच काळाच्या आड गेलेः शरद पवार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2017 9:04 am

Web Title: renowned marathi journalist writer arun sadhu passed away comments from famous personalities
Next Stories
1 ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचे निधन
2 समृद्धी प्रकल्पग्रस्तांची फसवणूक
3 चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग बंद
Just Now!
X