News Flash

स्वरभावयात्रा थांबली : ज्येष्ठ भावगीत गायक विनायक जोशी यांचे निधन

इंदूर येथील मैफलीवरून परतत असतानाच हृदयविकाराने निधन

गीत नवे गाईन मी, सरींवर सरी, बाबुल मोरा, चित्रगंगा, स्वरभावयात्रा, तीन बेगम आणि एक बादशहा यांसारख्या असंख्य सांगितीक कार्यक्रमांचे संकल्पक, ज्येष्ठ भावगीत गायक विनायक जोशी यांचे शनिवारी मध्यरात्री इंदूरचा कार्यक्रम करून परतत असतानाच आकस्मिक निधन झाले, ते ५९ वर्षांचे होते.

इंदूर येथे श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त योजलेल्या कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर ते डोंबिवलीस परतत होते. वाटेतच धुळ्याजवळ त्यांना अस्वस्थ वाटू लागले. हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचे निधन झाले. विनायक जोशींना मैफल सादर करतानाच थोडा त्रास झाला, परंतु त्यांनी कार्यक्रम तसाच पूर्ण केला आणि सर्वांचा निरोप घेऊन ते निघाले. आणि वाटेतच हा प्रसंग ओढवला.

११ मे १९६१ रोजी जन्मलेले विनायक जोशी यांचे शास्त्रीय संगीतातील औपचारिक प्राथमिक शिक्षण पं. एस. के. अभ्यंकर यांचेकडे झाले. त्यानंतर संगीतकार बाळ बर्वे, दशरथ पुजारी यांचेकडे सुगम संगीताचे शिक्षण घेतल्यानंतर गजल गायनासाठी पं. विजयसिंह चौहान यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. बँक ऑफ इंडियात नोकरी करणारे विनायक जोशी काही महिन्यातच निवृत्त होणार होते. स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समितीचे ते विश्वस्त होते. चतुरंग प्रतिष्ठानचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. किरण जोगळेकर यांच्या निधनानंतर डोंबिवली चतुरंगला बसलेला हा मोठा धक्का आहे..

वसंत प्रभू, वसंत पवार, वसंत देसाई यांच्या गाण्यांवर बेतलेला ” वसंत बहार “, गजलकार संदीप गुप्ते यांच्या गजलांवर आधारलेला ” जरा सी प्यास “, खगोल अभ्यासक हेमंत मोने यांच्या माहितीपूर्ण निवेदनासह साकारलेला ” सूर नभांगणाचे “, स्वरतीर्थसाठी आयोजित केलेले ” भाभी की चूडियॉं “, वसंत आजगावकर-मधुकर जोशी यांच्या गीतांना 50 वर्षे झाल्याच्या निमित्ताने बेतलेला ” करात माझ्या वाजे कंकण ” हा व असे अनेक कल्पक कार्यक्रम विनायक जोशी यांनी सादर केले.

अमेरिकेतील न्यू जर्सी व रिचमंड येथे सोलो कार्यक्रम, दिल्ली-जालंधर जम्मू येथे सैगल गीतांवरचे कार्यक्रम त्यांनी सादर केले. येत्या जुलै महिन्यात सुधीर फडके यांना श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्ताने एका सर्वस्वी नव्या कार्यक्रमाची जुळवाजुळव त्यांनी सुरू केली होती..

२०१९ च्या गुढीपाडव्याला डोंबिवलीकर मासिक परिवारातर्फे आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार देऊन विनायकला सन्मानित करण्यात आले होते. विनायकने लोकसत्तासाठी लिहिलेल्या स्वरभावयात्रा या स्तंभाचे त्याच शिर्षकाचे पुस्तक परममित्र प्रकाशनाने अलीकडेच प्रसिद्ध केले होते. त्यांचेमागे पत्नी पूर्णिमा, मुलगा गंधार आणि सून गेयश्री आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2020 7:07 pm

Web Title: renowned singer vinayak joshi passed away pkd 81
Next Stories
1 सुहाना खानचं बॉलिवूड पदार्पण, ‘बिग बॉस’ स्पर्धकाशी करणार रोमान्स?
2 Video : विधू विनोद चोप्रांचं बाळासाहेब ठाकरेंविषयी महत्त्वाचं विधान
3 Video : काही चुकलं असेल तर माफ करा…पत्रकार परिषदेतच डॉ. अमोल कोल्हेंना अश्रू अनावर
Just Now!
X