निश्चलनीकरण, मालमत्ता कायद्यातील तरतुदींचा परिणाम; घरांच्या किमतींमध्ये फारसा फरक नाही

गेल्या पाच-सहा वर्षांत मंदीने ग्रासलेल्या बांधकाम व्यवसायाची स्थिती निश्चलनीकरणानंतर अधिकच दोलायमान झाली असून आगामी वर्षांत नवी घरे निर्माण होण्याचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असणार आहे. नव्याने येऊ घातलेला स्थावर जंगम मालमत्ता कायदा आणि निश्चलनीकरणाचा फटका बसणार असून ग्राहकांचा कल प्रामुख्याने भाडय़ांच्या घरांकडे असेल, असा दावा नाइट फ्रँक या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सल्लागार कंपनीने केला आहे.

जुलै-डिसेंबर २०१६ हा सहा महिन्यांचा अहवाल अलीकडेच या कंपनीने सादर केला. या अहवालानुसार, बांधकाम व्यवसाय मंदीच्या सावटाखालून पूर्णपणे बाहेर येऊ शकलेला नाही. २०१६च्या सुरुवातीला असलेल्या दोन लाख १३ हजार ७४२ घरांपैकी एक लाख ५४ हजार ६९९ घरे विक्रीविना पडून आहेत. गेल्या वर्षी घरांच्या विक्रीत वाढ झाली, परंतु नोव्हेंबरमध्ये निश्चलनीकरणानंतर गृहविक्रीचा जोर पूर्ण ओसरला आहे. हीच परिस्थिती पुढील सहा महिने कायम राहण्याची शक्यता ‘नाइट फ्रँक’ने आपल्या अहवालातून व्यक्त केली आहे. निश्चलनीकरणामुळे अनेक बांधकाम व्यावसायिकांनी आपले प्रकल्प लांबणीवर टाकले आहेत. विशेष म्हणजे, ग्राहकही गृहविक्रीबाबत फारसे उत्सुक नसून भाडय़ाच्या घरांकडे त्यांचा कल अधिक राहील, असे या अहवालात म्हटले आहे.

निश्चलनीकरणाचा फटका आणि स्थावर जंगम मालमत्ता कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यामुळे घरांचे दर कोसळतील, असा अंदाज होता; परंतु त्यामध्ये फारसा फरक पडलेला नाही. उच्चभ्रू तसेच उच्च मध्यमवर्गीयांसाठी असलेल्या आलिशान घरांची विक्री खोळंबल्याने ते दर १५ ते २० टक्के खाली आले; परंतु सामान्यांच्या स्वप्नातील टू-बीएचकेच्या आकाराच्या घरांच्या किमतीत फारसा फरक पडला नाही. ही घरे विकली गेली नाही तरी ती ताब्यात ठेवण्याची क्षमता आजही विकासकांकडे आहे. परिणामी घरांच्या किमती परवडत नसल्यामुळे अनेकांनी भाडय़ांच्या घराचा पर्याय स्वीकारला. २०१५ च्या तुलनेत २०१६ चा विचार केल्यास भाडय़ाच्या घरांच्या मागणी मुंबईत १६ टक्क्य़ांची वाढ झाली आहे. मुंबई महानगर प्रदेश आणि पुण्यात अनुक्रमे १४ व चार टक्के आहे. आगामी वर्षांत ते प्रमाण वाढेल, असा दावा कंपनीने केला आहे.

घरांची मागणी आणि पुरवठा यात या वर्षांत तफावत आढळून आली आहे. निश्चलनीकरणाचा फटका बसलाच; परंतु त्याआधीही घरांची विक्री फारशी आल्हाददायक नाही. आणखी तीन महिने तरी अशीच स्थिती राहील. मागणी तशीच राहिल्याने आणि पुरवठा मर्यादित असल्यामुळे या वर्षांत घरे भाडय़ाने घेण्याच्या संख्येत १६ टक्क्य़ांनी वाढ दिसून आली. ती आणखी काही महिने कायम राहील.

डॉ. सामंतक दास, संशोधन विभागाचे राष्ट्रीय संचालक, नाइट फ्रँक इंडिया