07 April 2020

News Flash

‘मेट्रो’बाहेरील सायकल सेवेला चांगला प्रतिसाद

मेट्रो १ मार्गावरील ११ स्थानकांसाठीदेखील ही सेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवल्याचे त्यांनी नमूद केले.

तीन दिवसांत १०० प्रवाशांकडून वापर

मुंबई : मेट्रोच्या स्थानकापासून आपले ईप्सित स्थळ गाठण्यासाठी जागृतीनगर मेट्रो स्थानकाबाहेर भाडेतत्त्वावर सायकल सेवा रविवारपासून उपलब्ध झाली आहे. प्रवासखर्च आणि वाहतूक कोंडीतून दिलासा देणाऱ्या या सेवेला पहिल्या दिवसापासून चांगला प्रतिसाद मिळत असून जवळपास १०० प्रवाशांनी मंगळवारी दुपापर्यंत या सेवेचा फायदा घेतल्याचे दिसून आले.

‘सोमवारी ४० जणांनी अ‍ॅप डाऊनलोड करून पाचशे रुपये अनामत रक्कम भरली असून, दिवसभरात २५ प्रवाशांनी सायकली भाडय़ाने वापरण्यात आल्या,’ असे ‘माय बाईक’चे अर्जित सोनी यांनी सांगितले. आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी ४५ प्रवाशांनी सायकली भाडय़ाने घेतल्या, तर मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत २७ जणांनी सायकल सुविधेचा वापर केल्याची माहिती त्यांनी दिली.

या योजनेच्या पहिल्या टप्प्यात एकच मेट्रो स्थानक निवडले असून, सध्या ५० सायकली उपलब्ध आहेत. एक महिन्यात मेट्रो १ मार्गावरील ११ स्थानकांसाठीदेखील ही सेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवल्याचे त्यांनी नमूद केले. सायकल एका ठिकाणाहून घेऊन दुसऱ्या ठिकाणी जमा करण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास प्रतिसादात वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या केवळ एकच स्थानक आणि एकच सायकल स्टॅण्ड असला तरी प्रवाशांच्या प्रतिसादानुसार इतर स्थानके आणि काही महत्त्वाच्या ठिकाणी सायकल सुविधा सुरू करण्यात येईल, असे मेट्रो १च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो स्थानकापर्यंतचे आणि स्थानकातून ईप्सित स्थळापर्यंतचे प्रवाशांचे दळणवळण सुकर होण्यासाठी ‘स्टेशन अ‍ॅक्सेस अ‍ॅण्ड मोबिलिटी प्रोग्राम’ (स्टॅम्प) या उपक्रमांतर्गत अनेक स्टार्टअप्स आणि खासगी आस्थापनांना प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन जुलैच्या अखेरीस केले होते. त्यामध्ये आलेल्या ८० प्रस्तावांपैकी आबरे एआय, ऑल माइल्स आणि माय बाईक या स्टार्टअपच्या प्रस्तावांना नोव्हेंबरमध्ये पथदर्शी योजना म्हणून मान्यता दिली होती. घाटकोपर ते वर्सोवा या मेट्रो १ मार्गावर या योजना राबविण्यात येणार असून, त्यापैकी ‘माय बाईक’ ही सुविधा रविवारी सुरू करण्यात आली आहे. या सायकली जीपीएसने जोडलेल्या असून त्या भाडय़ाने घेण्यासाठी ‘माय बाईक’ अ‍ॅपचा वापर करावा लागेल.

दरपत्रक

* प्रतितास दोन रुपये

* साप्ताहिक पास रु. २८०/-

* मासिक पास रु. ९००/-

* दोन महिन्यांच्या पासवर एक महिना मोफत

* साप्ताहिक आणि मासिक पास घेतल्यास सायकल मुक्कामी घेऊन जाण्याची मुभा.

* ‘माय बाईक’ या अ‍ॅपच्या वॉलेटमध्ये किमान ५०० रुपये शिल्लक असणे गरजेचे आहे.

वांद्रे-कुर्ला संकुलात ‘युलु’

वांद्रे (पूर्व) ते कुर्ला (पश्चिम) आणि वांद्रे-कुर्ला संकुलातील प्रवासासाठी युलु इलेक्ट्रिक बाईकची सुविधा या महिनाअखेपर्यंत सुरू होईल, असे युलुचे सहसंस्थापक हेमंत गुप्ता यांनी सांगितले. सध्या यासाठीच्या स्थानकांचे काम सुरू असून एकूण २० स्थानके निश्चित करण्यात आली आहेत. जानेवारीच्या अखेरीस या संदर्भात एमएमआरडीए आणि युलु यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला होता. लवकरच ही सेवादेखील कार्यरत होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2020 3:32 am

Web Title: rental bicycle service outside the metro station in mumbai zws 70
Next Stories
1 नेहरू सेंटरमध्ये अवकाशसौंदर्य भिंतीवर अवतरणार
2 ‘स्मार्ट मुंबई’साठी केवळ १४ हजार मुंबईकरांचे मतदान
3 ‘असेन मी, नसेन मी तरी असेल गीत हे’
Just Now!
X