भाजपने राज्यात सत्तेत असताना मुंबई महापालिकेवर डोळा ठेऊन शहरांतील प्रभागांची फेररचना केली होती. त्यामुळेच मोठय़ा संख्येने भाजपचे नगरसेवक निवडून आले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने मुंबईमधील प्रभागांची पुन्हा एकदा फेररचना करावी, अशी मागणी मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक २०१७ मध्ये पार पडली. त्यावेळी राज्यामध्ये भाजपचे सरकार होते. दरम्यानच्या काळात शिवसेना आणि भाजपमध्ये कुरबूर सुरू होती. ही बाब लक्षात घेऊन भाजपने पालिकेच्या प्रभागांच्या रचनेत आमूलाग्र बदल घडवून आणले. अल्पसंख्यांकांचे वर्चस्व असलेले प्रभाग विभागण्यात आले. तर काही प्रभाग भाजपसाठी अनुकूल बनविण्यात आले. त्यामुळेच मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीत भाजपचे नगरसेवक मोठय़ा संख्येने निवडून आले.
हा प्रकार गंभीर आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या प्रभागांची पुन्हा एकदा फेररचना करण्यात यावी, अशी आग्रही मागणी रवी राजा यांनी केली आहे. या संदर्भात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 20, 2020 12:22 am