|| प्रसाद रावकर

पश्चिम उपनगरांत जाणाऱ्यांना द्राविडी प्राणायम

मुंबई : मलबार हिल, वाळकेश्वर परिसराला केम्स कॉर्नरशी जोडणाऱ्या बी. जी. खेर मार्गाची दुरुस्ती रखडली असून पावसाळ्यानंतर मलबार हिल टेकडीची पाहणी करून या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. परिणामी, मलबार हिल, वाळकेश्वरमधील रहिवाशांना बाबुलनाथ परिसरातून द्राविडी प्राणायाम करीत केम्स कॉर्नर गाठून पश्चिम उपनगरांची वाट धरावी लागणार आहे.

गतवर्षी ५ ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसादरम्यान रात्री अकराच्या सुमारास मलबार हिलवरील कमला नेहरू पार्ककडून केम्स कॉर्नरच्या दिशेने जाणाऱ्या बी. जी. खेर मार्गावरील भलीमोठी संरक्षक भिंत खचली आणि बी. जी. खेर मार्गासह एन. एस. पाटकर मार्गाचीही वाताहात झाली. या मार्गावरील भलेमोठे वृक्ष उन्मळून पडले आणि रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या. परिणामी, दोन्ही मार्ग तात्काळ वाहतुकीसाठी बंद करावे लागले. त्याचबरोबर बी. जी. खेर मार्गाखालून गेलेल्या जलवाहिन्यांनाही फटका बसला. त्यामुळे या भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता. मात्र पालिकेच्या जलविभागाने तातडीने लगतच्या डोंगरवाडी परिसरातून जलवाहिनी वळवली आणि परिसराचा पाणीपुरवठा पूर्ववत केला. खचलेली संरक्षक भिंत उभारणे, रस्त्यांची पुनर्बांधणी करणे आदी विविध कामांसाठी पालिकेने आयआयटीतील तज्ज्ञ मंडळींची समिती नियुक्त केली होती. दरम्यानच्या कालावधीत मोठी दुर्घटना घडू नये म्हणून एन. एस. पाटकर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

कालांतराने या मार्गावरुन एकदिशा मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली. समितीने दिलेल्या अहवालानुसार एन. एस. पाटकर मार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत होऊ शकेल. मात्र टेकडीवरुन केम्स कॉर्नर जंक्शनवर जाणारा बी. जी. खेर मार्गाची दुरुस्ती मात्र टांगणीला लागली आहे. हा मार्ग टेकडीवरुन खाली येत आहे. संरक्षक भिंत खचली त्यावेळी डोंगरातील काही भागाची हानी झाली असावी असा अंदाज आहे. पुढच्या पावसाळ्यात टेकडीवर कोणत्या घडामोडी घडतात याची पाहणी करणे गरजेचे बनले आहे. पावसाळ्यानंतर टेकडीच्या स्थितीचा अंदाज घेऊन बी. जी. खेर मार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. मात्र तोपर्यंत मलबार हिल, वाळकेश्वार, बाणगंगा परिसरातील नागरिकांना केम्स कॉर्नर अथवा अन्य परिसरात जाण्यासाठी बाबुलनाथ भागातून द्राविडी प्राणायाम घडणार आहे.