पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई महापालिकेने दुरुस्ती केलेल्या रस्ता सहा तासांतच उखडल्याने शुक्रवारी पश्चिम महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली. पालिकेने गुरुवारी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास वाकोला येथील अर्धा किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. यात रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र सकाळी आठ वाजल्यापासून रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांच्या चाकामुळे या पट्टय़ातील खडी निघायला सुरुवात झाली. आणि काही वेळात या रस्त्यात खड्डे पडल्याने महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू होती. दोन्ही दिशेला हे काम सुरू असल्याने सकाळी दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या व सायंकाळी दहिसरच्या दिशेने येणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
पश्चिम महामार्गावर रोज तीन ते साडे तीन लाखांहून अधिक वाहनांची ये-जा असते. मात्र शुक्रवारी वाकोला येथील रामनगरजवळील रस्ता उखल्याने अनेक वाहन चालकांना याचा फटका बसला. तर काही दुचाकी चालक या रस्तावरुन घसरुन पडल्याची माहिती वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने दिली. कंत्राटदाराने केलेल्या निकृष्ट कामाचा फटका वाहनचालकांसह वाहतूक यंत्रणेलाही बसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत महापालिका आयुक्त अजय मेहता यांना संपर्क केला असता होऊ शकला नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Repair road damage in six hour
First published on: 05-12-2015 at 00:25 IST