शैलजा तिवले

वांद्रे-कुर्ला संकुलातील करोना आरोग्य केंद्रातील अतिदक्षता विभागातील वाढत्या मृत्यूदराच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या रुग्णालयीन मृत्यू विश्लेषण समितीने अद्याप पालिकेला अहवाल पाठविलेला नाही. अतिदक्षता विभाग चालविणाऱ्या  संबंधित कंपनीद्वारे मृतांची आवश्यक माहिती पुरविली जात नसल्याने मृत्यूचे विश्लेषण करण्यात अडचणी येत असल्याने अहवाल प्रलंबित असल्याचे समजते.

मोठय़ा करोना आरोग्य केंद्रांतील अतिदक्षता विभाग बाह्य़स्त्रोतात चालविण्यास दिले आहेत. बीकेसीत १०८ अतिदक्षता खाटा आहेत. हा विभाग ‘कार्डियाक हेल्थकेअर’ ही कंपनी चालवते. जुलैमध्ये सुरू झालेल्या या विभागात ३१० रुग्णांनी उपचार घेतले असून ११३ मृत्यूंची नोंद आहे. विभागाचा मृत्यूदर सुमारे २७ टक्कय़ांपर्यत पोहचला असून याची कारणमीमांसा करण्यासाठी मृत्यू विश्लेषण अहवाल देण्याचे आदेश पालिकेने रुग्णालय प्रशासनाला दिले. याला आता १५ दिवस उलटले तरी अद्याप समितीने अहवाल पालिकेला दिलेला नाही.

विभागातील मनुष्यबळ आणि रुग्ण व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी संबंधित कंपनीची असून आवश्यक यंत्रसामुग्री, औषधे, रुग्णांचे कपडे आदींचा पालिका पुरवठा करते. रुग्णालयाच्या मृत्यू विश्लेषण समितीमध्ये रुग्णालय प्रशासनासह कंपनीच्या वरिष्ठ डॉक्टरांचा समावेश आहे. ऑगस्टमध्ये पाच वेळा समितीची बैठक झाली. परंतु सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध असलेली रुग्णांची जुजबी माहिती कंपनीने बैठकीत सादर केली. मृत्यूचे विश्लेषण करण्यासाठी रुग्ण कोणत्या अवस्थेत दाखल झाला, त्यावेळी त्याला कोणते उपचार दिले गेले, प्रत्येक दिवशी दिलेले उपचार, रुग्णाची प्रकृती कोणत्या कारणांमुळे गंभीर झाली, त्यावेळस त्याला कोणते उपचार दिले गेले अशी इत्यंभूत माहिती प्राप्त होणे गरजेचे आहे. तरच मृत्यूच्या कारणांचा शोध घेणे शक्य आहे. परंतु कं पनीला वारंवार सूचना देऊनही ही माहिती सादर केली जात नसल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यासाठी पालिकेने नेमून दिलेल्या नियमावलींचे पालन केले जात नाही, ही प्रामुख्याने तक्रार कंपनीबाबत केली जात आहे. यासह रुग्णांची कागदपत्रे गहाळ होणे, रुग्ण दाखल आणि मृत्यूची  माहिती सॉफ्टवेअरमध्ये वेळेत न भरणे, रुग्णांच्या रक्ताचे नमुने अपुऱ्या माहितीसह तपासणीस देणे, विभागात कार्यरत असलेल्या डॉक्टरांच्या कामाचे वेळापत्रक न देणे अशाही काही बाबी कंपनीबाबत समोर आल्या आहेत. यासंबंधी कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला असता प्रशासकीय जबाबदारी पालिकेची असल्याने पालिका अधिकृत माहिती देईल, असे सांगत बोलण्यास नकार दिला. तर एक हजार खाटांच्या तुलनेत विचार केल्यास बीकेसीतील मृत्यूदराचे प्रमाण कमी आहे. अंतर्गत रुग्णालयीन समितीला अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. आवश्यकता भासल्यास पालिकेच्या मृत्यूविश्लेषण समितीलाही याचा अभ्यास करण्यास सांगितले जाईल, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

रुग्ण दाखल करण्यास कंपनीचा नकार

खाटा रिक्त असूनही आतापर्यत १०० हून अधिक रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यास कंपनीने नकार दिला आहे. रुग्ण दाखल करण्याचे पालिकेचे आदेश असूनही अतिदक्षता विभागातील डॉक्टर नकार देतात, असे  सूत्रांनी सांगितले.