प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील मरिन ड्राइव्हवर होणाऱ्या ऐतिहासिक संचलनाबाबत सर्वानाच उत्सुकता लागली असून हे संचलन पाहण्यासाठी नागरिकांनी सकाळी ८.१५पर्यंत परिसरात उपस्थित रहावे असे आवाहन राज्य शासनातर्फे करण्यात आले आहे. राजशिष्टाचार मंत्री व या सोहळ्याचे संयोजक सुरेश शेट्टी यांनी शनिवारी मरीन ड्राईव्ह परिसरात भेट देऊन संचलन सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. देशाच्या संरक्षणाची धुरा सांभळणाऱ्या तिनही दलांच्या सशस्त्र तुकडय़ांचा सहभाग हे यंदाच्या सोहळय़ाचे विशेष आकर्षण असणार आहे. प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे पावित्र्य लक्षात घेऊन शिस्तबध्द पध्दतीने या सोहळ्याचा आनंद घ्यावा व वाहतुकीची होणारी कोंडी लक्षात घेता खाजगी वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही शेट्टी यांनी केले आहे. राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या हस्ते सकाळी ९.१५ वाजता ध्वजारोहण करण्यात येणार असून त्यानंतर संचलनात सहभागी झालेल्या वायुदल, सेनादल, नौदल, पोलिस दलाकडून राज्यपाल मानवंदना स्वीकारतील.
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात एस.टी.चा चित्ररथ
ठाणे : राज्य परिवहनमधून प्रवास करण्याचे फायदे, सवलती आणि योजनांची माहिती देणारा चित्ररथ ठाणे विभागीय कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी तयार केला असून रविवारी दादोजी कोंडदेव स्टेडिअम येथील होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलनात तो प्रदर्शित केला जाणार आहे. कार्यशाळेतील प्रमुख कारागीर शाम सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या चित्ररथात कर्मचाऱ्यांनी टाकाऊ भंगारातून परिवर्तन बस तयार केली आहे. ध्वनिफितीद्वारे एस.टी.चा महिमा नागरिकांपर्यंत पोहोचविला जाणार आहे.