मुंबई पोलिसांनी मोठ्या TRP घोटाळ्याचा पदार्फाश केला आहे. यात तीन टीव्ही चॅनल्स आहेत. अर्णब गोस्वामीच्या ‘रिपब्लिक टीव्ही’ या वृत्तवाहिनीचेही यात नाव आले आहे. या टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्ही च्या बरोबरीने ‘फक्त मराठी’ आणि ‘बॉक्स सिनेमा’ यांचा तपास सुरु आहे असे मुंबईचे पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांनी गुरुवारी सांगितले. रिपब्लिक टीव्हीच्या प्रवर्तक आणि संचालकांना लवकरच समन्स बजावले जाईल असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

टीआरपीवरुन, टीव्हीवरील कुठला कार्यक्रम जास्त पाहण्यात आला, कुठल्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती आहे तसेच कुठेल चॅनल सर्वाधिक पाहिले जाते, ते समजते. म्हणून टेलिव्हिजनवर टीआरपी रेटिंगला खूप महत्त्व असते.

या रॅकेटबद्दल सविस्तर माहिती देताना परम बीर सिंह म्हणाले की, ‘हंसा’ नावाची संस्था टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी या चॅनल्सना मदत करत होती. “मुंबईत जवळपास दोन हजार बॅरोमीटर बसवण्यात आले होते. टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला” असे सिंह यांनी सांगितले.

“या चॅनलच्यावतीने दर महिन्याला काही जण वेगवेगळया घरांमध्ये जायचे व पैसे द्यायचे. लोकांना ही चॅनल्स लावायला सांगितले जायचे” अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. दोन अन्य चॅनलच्या मालकांना आज अटक करण्यात आली असे अधिकाऱ्याने सांगितले.

या रॅकेटतंर्गत प्रत्येक घरामध्ये दर महिन्याला ४०० ते ५०० रुपये दिले जायचे असे पोलिसांनी सांगितले. अनेक कुटुंबांनी त्यांना पैसे मिळाल्याचे मान्य केले असे पोलिसांनी सांगितले. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या टीआरपी रॅकेटचा घोटाळा उघड केला. या प्रकरणात पोलिसांनी दोन मराठी वाहिन्यांच्या मालकांना अटक केली आहे.