प्रस्थापित नेतृत्वाविरुद्ध नाराजी, वस्त्यावस्त्यांमध्ये ऐक्यासाठी बैठका
महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांचा आणि बहुजन समाज पक्षाचा दारुण पराभव झाल्यामुळे आंबेडकरी तरुणांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आगामी २०१९च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये आंबेडकरी राजकारणाची ताकद दाखविण्यासाठी आता विविध संघटनांतील तरुणांनी एकत्र येऊन वस्त्यावस्त्यांमध्ये बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. या बैठकांमधून प्रस्थापित नेतृत्वाविरुद्ध नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात नगरपालिका तसेच मुंबईसह दहा महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडल्या. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाने भाजपबरोबर युती करुन निवडणुका लढविल्या. आंबेडकरी तरुणांचे मुंबई महापालिका निवडणुकीकडे लक्ष लागले होते. मात्र त्यांचा अपेक्षाभंग झाला. मुंबईत अनेक विभागात आंबेडकरी समाजाची मते निर्णायक असताना एकाही रिपब्लिकन गटाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. गेल्या पंचवीस वर्षांत असे पहिल्यांदाच घडल्याने आंबेडकरी तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश हे आंबेडकरी राजकारणाची कर्मभूमी मानली जाते. मात्र चारवेळा राज्याची सत्ता हस्तगत करणाऱ्या मायावती यांच्या नेतृत्वाखालील बसप कुठल्याकुठे फेकला गेल्यामुळे महाराष्ट्रातील आंबेडकरी युवकांना धक्का बसला. सर्वच गटातींल कार्यकर्त्यांमध्ये सध्या खदखद सुरु आहे. काही अस्वस्थ तरुणांनी वस्त्या-वस्त्यांमध्ये जाऊन बैठका घेऊन रिपब्लिकन ऐक्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये घाटकोपर येथील रमाबाई नगर, वरळी, चेंबूर, कल्याण, साकीनाका अशा वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेण्यात आल्या. त्याला सर्वच गटातील कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- ८ एप्रिलला चेंबूर येथे काही संघटनांतर्फे एका बैठकीचे आयोजन
- १६ एप्रिलला मुंबईतच रिपब्लिकन पक्षाचे विविध गट व अन्य आंबेडकरवादी संघटनांची परिषद
- त्यात निवडणुकीतील पराभवाबरोबरच रिपब्लिकन राजकारणाच्या पुढील वाटचालीवर चर्चा होणार
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 6, 2017 12:38 am