डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलची संपूर्ण जमीन मिळावी, यासाठी दोन वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनाबद्दल पोलिसांनी गुरुवारी रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर व त्यांच्या १५ सहकाऱ्यांना अटक केली. या आधी रिपब्लिकन पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष गौतम सोनावणे व इतर कार्यकर्त्यांना अटक करून जामीनावर सोडण्यात आले आहे. परंतु त्यांना एक दिवसआड पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगण्यात आले आहे. रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको व निदर्शने करून आनंदराज यांच्या अटकेचा निषेध केला.  
आंबेडकर स्मारकासाठी इंदू मिलची संपूर्ण जमीन मिळावी यासाठी ६ डिसेंबर २०११ रोजी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली उग्र आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर १५ डिसेंबरला रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली याच मागणीसाठी इंदू मिलवर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी कार्यकर्त्यांनी मिलमध्ये घुसून आतील सामानांची नासधूस केली होती.