मुंबईतल्या डोंगरी भागात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. कौसर बाग इमारत ही शंभर वर्षे जुनी होती. या इमारतीच्या दुरुस्तीसाठी विकासक नियुक्त केला होता. या ठिकाणी जी कुटुंबं अडकली आहेत त्यांना बाहेर काढणं ही प्राथमिकता आहे. विकासकाने काय केलं? काय केलं नाही? या सगळ्याची चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सगळी योग्य माहिती घेऊन त्यानंतर मदतीसंदर्भातली घोषणा केली जाईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या ठिकाणी अरुंद गल्ल्या आहेत त्यामुळे बचाव कार्य आणि लोकांचा जीव वाचवणं ही प्राथमिकता आहे त्यानंतर इतर सगळ्या गोष्टी होतील असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच या दुर्घटनेबाबत त्यांनी दुःखही व्यक्त केले आहे.

मुंबईतल्या डोंगरी भागात कौसर बाग ही इमारत कोसळली. ही इमारत कोसळून १० ते १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. तळमजल्यासह चार मजल्यांची ही इमारत आहे. ही म्हाडाची इमारत होती, विकासकाकडे या इमारतीच्या देखभालीची जबाबदारी देण्यात आली होती. तरीही इमारत का पडली? हा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. इमारत सकाळी साडेअकरच्या सुमारास पडली आहे. ही इमारत पडली तेव्हा भलामोठा आवाज झाला आम्हाला आधी वाटलं की भूकंपच झाला, हे सांगताना प्रत्यक्षदर्शींना अश्रू अनावर झाले होते या प्रकरणाची चौकशी होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.