करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाकाला लावण्याच्या औषधावर आयआयटी, मुंबईने संशोधन सुरू केले असून केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने या प्रकल्पाला साहाय्य केले आहे. त्याचप्रमाणे करोना बाधित रुग्णांच्या शरीरक्रियांमध्ये काय बदल झाला याचाही अभ्यास आयआयटी करत आहे.

करोना विषाणूवरील संशोधनासाठी शासनाने आवाहन केले होते. त्याअनुषंगाने विविध विद्यापीठे, संस्थांनी मांडलेल्या प्रकल्पांपैकी पाच प्रकल्पांना विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामध्ये आयआयटी, मुंबईच्या जैवविज्ञान आणि जैवअभियांत्रिकी विभागाच्या दोन प्रकल्पांचा समावेश आहे.

करोनावर प्रतिबंधक लस शोधण्यासाठी जगातील अनेक देश, प्रयोगशाळा, औषध कंपन्या कार्यरत आहेत. त्याचबरोबर आता आयआयटी, मुंबईने करोनावरील औषधाच्या निर्मितीसाठी संशोधन सुरू केले आहे. करोनावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हे औषध तयार करण्यासाठी आयआयटीतील संशोधक झटत आहेत.

अभ्यासाअंती हाती येणाऱ्या निष्कर्षांचा उपयोग या करोना विषाणू संसर्गावरील उपाय शोधण्यासाठी होणार आहे. त्यासाठी कस्तुरबा रुग्णालयही संस्थेला सहकार्य करत असल्याची माहिती आयआयटी, मुंबईच्या संशोधन आणि विकास विभागाचे डॉ. मिलिंद अत्रे यांनी दिली.

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने आयआयटी कानपूर, आयआयटी, दिल्ली आणि बंगळूरु येथील जवाहरलाल नेहरू सायन्स सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स सायंटिफिक स्टडीज या संस्थांच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.

विषाणूला अटकाव..

* जेल स्वरूपातील औषध नाकाला लावल्यानंतर विषाणूला नाकावाटे शरीरात प्रवेश करण्यापासून रोखणे शक्य.

* प्रा.डॉ. किरण कोंडाबगील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे संशोधन सुरू.

* आयआयटी, मुंबईच्या दुसऱ्या प्रकल्पांतर्गत रुग्णांच्या शरीरातील बदलांवर संशोधन होणार.

* करोनाबाधितांच्या शरीरक्रियांतील बदल आणि त्यांच्या दूरगामी परिणामांबाबत डॉ. संजीव श्रीवास्तव आणि सहकाऱ्यांचा अभ्यास.