पाच चरित्र ग्रंथांचेही गुरुवारी प्रकाशन
संशोधन, ग्रंथव्यवहार आणि ग्रंथालय क्षेत्रात आपला स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या मुंबईतील एशियाटिक सोसायटीच्या २१२व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने २६ नोव्हेंबर रोजी मुंबईत एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात पाच व्यासंगी संशोधकांचा मानद गौरववृत्ती देऊन सन्मान करण्यात येणार असून पाच चरित्र ग्रंथांचेही प्रकाशन केले जाणार आहे. जर्मन दूतावासाचे राजदूत सिबर्ट यांच्या हस्ते या पाच मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे.
१८०४ मध्ये संस्थेची स्थापना झाल्यानंतर १८१५ पासून देशातील आणि परदेशातील व्यासंगी, विद्वान आणि संशोधकांना मानद गौरववृत्ती देऊन सन्मानित करण्यात येत आहे. यंदा सोसायटीचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार डॉ. अरुण टिकेकर, कॅनडास्थित इतिहासतज्ज्ञ व प्राच्यविद्या अभ्यासक प्रा. नरेंद्र वागळे, भारतीय व आशियाई दृश्यकला आणि वास्तुकला यांचे अमेरिकास्थित अभ्यासक प्रा. प्रमोदचंद्र, अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर, दक्षिण आशियाई संस्कृती व इतिहासाच्या विविध पैलूंचे अस्सल साधनांद्वारे संशोधन करणारे अमेरिकास्थित डॉ. स्टुअट गार्डन यांचा या सोहळ्यात गौरववृत्ती देऊन सत्कार करण्यात येणार आहे. एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष शरद काळे यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटीच्या दरबार हॉलमध्ये सायंकाळी पाच वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

एशियाटिक ग्रंथालय व सोसायटी यांचे संवर्धन करून येथील ज्ञानठेव्याचे जतन करण्यात ज्या युरोपियन व्यक्तींनी भारतात राहून आपले आयुष्य खर्ची केले त्यांचे चरित्र प्रकाशित करण्याचा उपक्रम सोसायटीने हाती घेतला आहे. यंदाच्या वर्षी सर मॅकिन्तोश, पश्चिम भारतातील मराठीचा अभ्यास करणारे रेव्ह. पी. अ‍ॅण्डरसन, सोसायटीच्या सुरुवातीच्या काळातील अध्यक्ष फ्रियर, ‘लिटररी सोसायटी’ या एशियाटिकच्या पूर्वरूपाशी संबंधित विल्यम अस्र्किन, भाषाशास्त्रज्ञ व शिलालेखतज्ज्ञ ब्लूल्हर यांच्या चरित्रांचा समावेश आहे.