एम.फिल. आणि पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांसमोर पेच

एकीकडे विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्राकडे वळावे असे आवाहन सातत्याने करण्यात येत असताना प्रत्यक्षात मात्र संशोधन करू इच्छिणाऱ्या मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना वेळेवर अभ्यासवृत्तीही मिळत नसल्याचे समोर आले आहे. नियमानुसार दुसरीकडे नोकरी करण्यास र्निबध आणि पुस्तके, राहणे यांचा वाढता खर्च यांमुळे गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करणेही कठीण होऊ लागले आहे.

प्राध्यापक होण्यासाठी केंद्रीय स्तरावरून घेण्यात येणाऱ्या पात्रता परीक्षेच्या माध्यमातून (नेट) संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचीही निवड करण्यात येते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) योजनेनुसार एम.फिल. आणि पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी अभ्यासवृत्ती देण्यात येते. एम.फिल. करणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा पाच हजार रुपये आणि पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांला दरमहा आठ हजार रुपये अभ्यासवृत्ती देण्यात येते. एम.फिल. आणि पीएच.डी. हे पूर्णवेळ अभ्यासक्रम असल्यामुळे या विद्यार्थ्यांना दुसरीकडे नोकरी करता येत नाही. तासिका तत्त्वावर प्राध्यापक म्हणूनही काम करता येत नाही. ज्या विभागात विद्यार्थी संशोधन करत असतील. त्या विभागात रोज हजेरी लावावी लागते. एक दिवसही अनुपस्थिती असल्यास त्यांच्या अभ्यासवृत्तीतून रक्कम वजा करण्यात येते.

संशोधन करणाऱ्या या विद्यार्थ्यांना अभ्यासवृत्तीचा मोठा आधार असतो. मात्र मुंबई विद्यापीठात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना जवळपास गेले वर्षभर ही अभ्यासवृत्ती मिळालेली नाही. आयोगाकडून अभ्यासवृत्तीची रक्कम न आल्यामुळे विद्यापीठानेही विद्यार्थ्यांना ती दिलेली नाही.

संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे रोजचे खर्च, संशोधनासाठी येणारा खर्च, शैक्षणिक साहित्य, बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे वसतिगृहाचे शुल्क असा सगळा खर्च भागवणे जिकिरीचे झाले आहे. ‘संशोधनाचे काम जसे पुढे सरकते तसा खर्च वाढत जातो.

काही वेळी बाहेरच्या संस्थांमध्ये जावे लागते, प्रवास करावा लागतो. पुस्तके इतर साहित्याचा खर्चही वाढला आहे. याशिवाय शुल्कही वाढले आहे. मात्र अभ्यासवृत्ती न मिळत नसल्यामुळे अडचण होते आहे,’ असे एक विद्यार्थ्यांने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

‘अडचण असल्यास विद्यार्थ्यांनी भेटावे’

‘अभ्यासवृत्तीबाबत संबंधित विभागाकडून माहिती घेतो. याबाबत विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास त्यांनी भेटावे,’ असे मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव एस. जी. भिरूड यांनी सांगितले.