प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे बोर्डाचा नवा नियम

बाहेरगावच्या प्रवासाला जाण्यासाठी १२० दिवस आधीपासून केलेले आरक्षण रद्द करण्यासाठीची प्रवाशांची वणवण कमी करण्यासाठी आता रेल्वे बोर्डाने आरक्षण रद्द करण्याच्या नियमांत बदल केले आहेत. या नव्या नियमांनुसार तिकीट रद्द करण्यासाठी प्रवासी आरक्षण केंद्रापर्यंत जाण्याऐवजी अनारक्षित तिकीट प्रणालीवरही हे काम होणार आहे. १ डिसेंबरपासून या नियमाची अंमलबजावणी सुरू झाली असून त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल, असे रेल्वे अधिकारी स्पष्ट करत आहेत.
आरक्षण रद्द करण्यासाठी प्रवाशांना प्रवासी आरक्षण केंद्रापर्यंत जावे लागत होते. आरक्षण केंद्राच्या वेळा ठरलेल्या असल्याने प्रवाशांनाही त्याप्रमाणेच वेळ जुळवावी लागत होती. तसेच रेल्वेने काही महिन्यांपूर्वी आरक्षण रद्दीकरणाचे नियम बदलल्यानंतर रद्द तिकिटाचे पैसे परत मिळण्यावरही वेळेची बंधने लावण्यात आली आहेत. प्रवाशांना तिकीट रद्द करण्याचे विविध पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे बोर्डाने अनारक्षित तिकीट प्रणाली म्हणजेच रेल्वे स्थानकांवरील तिकीट खिडक्यांवरही आरक्षण तिकीट रद्द करून देण्याची सोय केली आहे. यामुळे प्रवाशांना प्रवासी आरक्षण केंद्रापर्यंत जावे लागणार नसून तिकीट खिडक्यांच्या वेळेत आपले तिकीट रद्द करून घेता येईल. मात्र ही सुविधा प्रवासी आरक्षण केंद्र उपलब्ध असलेल्या स्थानकांवरील तिकीट खिडक्यांवरच उपलब्ध असेल, असे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. आलोक बडकुल यांनी सांगितले.