राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात स्थानिक विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय रद्द करण्यात येणार असून, त्याबाबत मंगळवारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भातील वैद्यकीय प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.

राज्यातील वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयांचे मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र असे वर्गीकरण करून या अभ्यासक्रमांसाठी स्थानिक विद्यार्थ्यांसाठी जागा राखून ठेवण्यात येतात. त्यानुसार ज्या भागांतील वैद्यकीय महाविद्यालय असेल तेथील विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात, तर उर्वरित ३० टक्के जागांवर राज्यातील इतर भागांतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो. मराठवाडा आणि विदर्भात महाविद्यालयांची संख्या कमी आणि प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे हा निर्णय रद्द करण्याची मागणी पालक आणि विद्यार्थी करत होते. याबाबत तेथील स्थानिक नेते, आमदार यांनीही मागणी केली होती. प्रवेशाचे ७०-३० असे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

काय होणार?

स्थानिक विद्यार्थ्यांना ७० टक्के जागांवर प्रवेश देण्याच्या निर्णयामुळे प्रवेश परीक्षेत चांगले गुण असूनही अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकत नव्हता. स्थानिक आरक्षण रद्द झाल्यावर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या जागांवर गुणवत्ता यादीनुसार प्रवेश होतील. गुणवत्तेच्या निकषांमध्ये बसत असल्यास विद्यार्थी राज्यातील कोणत्याही भागांतील महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकतील.

काय झाले?

राज्यातील शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया ७०-३० या प्रमाणे राबवण्याचा निर्णय १९८५ पासून प्रवेश पुस्तिकेत समाविष्ट करण्यात आला. वैद्यकीय महाविद्यालये वेगवेगळ्या विद्यापीठांशी संलग्न होती त्यावेळी विद्यापीठाच्या कक्षेतील विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के आणि इतर विद्यापीठांतील विद्यार्थ्यांसाठी ३० टक्के जागा ठेवणे अशी यामागची भूमिका होती. मात्र, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या स्थापनेनंतरही हा निर्णय बदलण्यात आला नाही. अशा स्वरूपाचे आरक्षण देणे कायदेशीर नसल्याचा आक्षेप घेत पालकांनी उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. मराठवाडय़ात ८ आणि विदर्भात ६ तर उर्वरित महाराष्ट्रात २६ महाविद्यालये आहेत. मराठवाडा आणि विदर्भात मिळून साधारण २३०० जागा तर उर्वरित भागांत ३८०० जागा उपलब्ध असतात. या तफावतीमुळे मराठवाडा, विदर्भातील विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रातील महाविद्यालये वगळून इतर भागांतील महाविद्यालयांत ३० टक्केच जागांवरील प्रवेशासाठी स्पर्धा करावी लागत होती.

वैद्यकीय अभ्यासक्रम

विभाग      महाविद्यालय उपलब्ध जागा

उर्वरित महाराष्ट्र २६     ३८५०

विदर्भ      ८      १४५०

मराठवाडा   ६      ८५०

दंतवैद्यकीय अभ्यासक्रम

विभाग     महाविद्यालय   उपलब्ध जागा

उर्वरित महाराष्ट्र १८     १५६०

विदर्भ      ५      ४००

मराठवाडा   ७      ६५०