मुंबई सेंट्रल स्थानकातील धक्कादायक प्रकार
मुंबई सेंट्रल येथील प्रवासी आरक्षण केंद्रात विषारी वायू फवारल्याचा प्रकार बुधवारी घडला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकाराने रेल्वेस्थानकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पश्चिम रेल्वेवर लांब पल्ल्याच्या गाडय़ा सुटण्याचे महत्त्वाचे टर्मिनस असल्याने मुंबई सेंट्रल स्थानकात दररोज आरक्षणासाठी गर्दी असते. येथील आरक्षण केंद्रात बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास दीपक पांडे हा तरुण अचानक घुसला.
केंद्रात शिरताच त्याने त्याच्याकडील विषारी रसायन फवारले. केंद्रातील वातानुकूलन यंत्रणेमुळे रसायन हवेत पसरले आणि त्यामुळे आरक्षण केंद्रातील कर्मचारी व केंद्राबाहेर उभ्या असलेल्यांना त्रास होऊ लागला. अनेकांना श्वास घेण्यास अडचण वाटू लागली. या प्रकाराने घाबरलेल्या सर्वानीच घटनास्थळावरून पळ काढला.
दरम्यान, घटनेचे वृत्त समजताच रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी दीपकला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला नागपाडा पोलिसांच्या हवाली करण्यात आले. मलबार हिलचा रहिवासी असलेला दीपक हा सराईत गुन्हेगार असून त्याने चोरीच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचे समजते.
मात्र, त्याच्याकडे विषारी रसायनाची कोणतीही पुडी अथवा अन्य साहित्य मिळाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे रसायन फवारणीमागील गूढ वाढले आहे. रात्री उशिरापर्यंत दीपकची चौकशी सुरू होती.