पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
केंद्रात किंवा विविध राज्यांमध्ये ज्या ज्या वेळी भाजपची सरकारे येतात, त्यावेळी आता दलित-आदिवासींचे आरक्षण रद्द होणार अशी हाकाटी पिटली जाते. विरोधक हा खोटा प्रचार मुद्दाम करतात. लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशा अफवा पसरवण्याचे प्रकार बंदच झाले पाहिजेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथील कार्यक्रमात काँग्रेसवर हल्लाबोल केला.
इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित आंतराष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. अंधेरी-दहिसर मेट्रो रेल्वेच्या दोन मार्गाच्या कामाचेही पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर कुर्ला-वांद्रे संकुलाच्या मैदानात झालेल्या जाहीर सभेत बोलताना मोदी यांनी इंदू मिलच्या जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या आंबेडकर स्मारकाचे संपूर्ण श्रेय भाजपला देत काँग्रेसला दलितविरोधी ठरविण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेसच्या एकाधिकारशाही राजवटीवरही त्यांनी सडकून टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला एक मजबूत संविधान दिले, लोकशाही दिली. त्या लोकशाहीवर जेव्हा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, त्याविरोधात जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली एक राजकीय आंदोलन उभे राहिले आणि त्या राजकीय आपत्तीतून भारताला मुक्त केले, असे मोदी म्हणाले.
ज्यांनी या देशाला संविधान दिले, त्यांचे संसदेत तैलचित्र बिगरकाँग्रेस सरकारच्या राजवटीत लावले गले. त्या वेळी त्या सरकारला भाजपचा बाहेरून पाठिंबा होता. ज्यांची सामंतशाही मानसिकता आहे, त्यांना एका दलित पुत्राला स्वीकारणे कठीण जात होते, अशी टीका त्यांनी काँग्रेसवर केली.
शिवसेनेच्या बहिष्कारावर मौन
या कार्यक्रमावर पूर्णपणे भाजपची छाप होती. केंद्रातील व राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने मात्र या कार्यक्रमावर अघोषित बहिष्कार टाकला. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात शिवसेनेचा साधा उल्लेखही केला नाही. स्मारक उभारणीत देशातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग असला पाहिजे, असे सांगताना नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील ४० हजार गावांमधून प्रत्येकी एक झाडाचे रोपटे स्मारकाच्या परिसरात लावण्याचे आवाहन केले.

ज्यांनी या देशाला संविधान दिले, त्यांचे संसदेत तैलचित्र बिगरकाँग्रेस सरकारच्या राजवटीत लावले गले. त्या वेळी त्या सरकारला भाजपचा बाहेरून पाठिंबा होता. ज्यांची सामंतशाही मानसिकता आहे, त्यांना एका दलित पुत्राला स्वीकारणे कठीण जात होते.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान

मोदी म्हणाले..

’मी पंतप्रधान होण्याच्या आधीपासून इंदू मिलच्या जागेवर स्मारक उभे राहावे यासाठी आंदोलने सुरू होती
’काही पक्षांच्या नशिबातच पवित्र काम करण्याचे नसावे, ते भाग्य भाजपला मिळाले.
’संविधानावर, लोकशाहीवर, सामाजिक न्यायावर, देशाचे ऐक्य-अखंडतेवर ज्यांचा विश्वास आहे, त्यांच्यासाठी हे प्रेरणास्थान असेल
’दिल्लीतील बाबासाहेबांच्या घराचेही स्मारकात रूपांतर करण्यात येत आहे.
’बाबासाहेबांचे मूळ गाव आंबवडे हे आदर्श गाव म्हणून त्याचा विकास करणार
’बाबासाहेबांचे जन्मस्थान महू येथे स्मारक उभारण्यात आले आहे
’लंडन येथील त्यांचे वास्तव्य असलेल्या घराचेही स्मारक होत आहे
’बाबासाहेबांच्या नावाने ही पंचतीर्थस्थाने बनविण्याचे भाग्य भाजपला मिळाले