संचालक मंडळ बरखास्त; अखेर ‘दिवाळखोरी’ची नामुष्की

आर्थिक अनियमितता आणि प्रवर्तकांच्या गैरव्यवहारामुळे अडचणीत आलेल्या दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन अर्थात डीएचएफएलचे संचालक मंडळ रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी बरखास्त केले. आता प्रशासकाच्या हाती कारभार सोपविण्यात आला असून कंपनीविरोधात नादारी आणि दिवाळखोरी संहितेनुसार लवकरच दिवाळखोरीची प्रक्रियाही सुरू केली जाणार आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी सायंकाळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, कंपनीच्या कारभारासंबंधी चिंता आणि अनेकांची देणी थकविणे आणि दायीत्वाच्या पूर्ततेतील कसूर लक्षात घेऊन डीएचएफएलचा कारभार प्रशासकाकडे सोपवत असल्याचे स्पष्ट केले. इंडियन ओव्हरसीज बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर. सुब्रमणियन यांची डीएचएफएलचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी आयएल अ‍ॅण्ड एफएस लिमिटेडला कर्ज परतफेडीतील अपयश पुढे आल्यानंतर, अनेक बँकेतर वित्तीय कंपन्यांपुढे रोकड तरलतेची मोठी समस्या निर्माण झाली. डीएचएफएलनेही सरलेल्या जूनपासून विविध मुदतीची देणी फेडता आलेली नसून, कर्जदात्या बँका आणि म्युच्युअल फंडांनांही याचा फटका बसला आहे. प्रस्तावित दिवाळखोरी प्रक्रियेत रिझव्‍‌र्ह बँकेकडून नियुक्त प्रशासक हेच ‘तिढा निवारण व्यावसायिक (आरपी)’ म्हणून कार्य करतील, असेही सूचित करण्यात आले आहे.

महत्त्वाचे काय? : गेल्या आठवडय़ात सरकारने ५०० कोटी रुपयांच्या घरात मालमत्ता असणाऱ्या बँकेतर वित्तीय कंपन्या आणि गृहवित्त कंपन्यांवर दिवाळखोरी न्यायाधिकरणापुढे त्यांनी थकविलेल्या रकमेच्या वसुलीसाठी प्रक्रिया सुरू करण्याची परवानगी रिझव्‍‌र्ह बँकेला दिली. त्यानुसार, दिवाळखोरीची कार्यवाही सुरू करण्यात आलेली डीएचएफएल ही देशातील पहिलीच बँकेतर कंपनी ठरणार आहे.