News Flash

सिद्धार्थ रुग्णालयातील शवागार केंद्राविरोधात रहिवासी रस्त्यावर

गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात उभारण्यात येत असलेल्या शवविच्छेदन आणि शवागार केंद्रास विरोध करण्यासाठी आसपासच्या सोसायटय़ांमधील रहिवाशांनी रस्त्यावर

| August 12, 2013 03:05 am

गोरेगावच्या सिद्धार्थ रुग्णालयात उभारण्यात येत असलेल्या शवविच्छेदन आणि शवागार केंद्रास विरोध करण्यासाठी आसपासच्या सोसायटय़ांमधील रहिवाशांनी रस्त्यावर उतरुन रविवारी आंदोलन केले. ‘करुन दाखविले’ची टिमकी वाजविण्यासाठी शिवसेना या परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात घालत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
वाढती लोकवस्ती लक्षात घेऊन पालिकेने गोरेगावमध्ये उभारलेले सिद्धार्थ रुग्णालय १९९८ मध्ये सुरू केले आणि या परिसरातीलगोरगरीब नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाली. त्यानंतर या परिसरातील लोकसंख्या झपाटय़ाने वाढत गेली. त्यामुळे पालिकेने या रुग्णालयामध्ये शवविच्छेदन आणि शवागार केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे बांधकाम सुरू केले. मात्र शवविच्छेदन आणि शवागार केंद्रामुळे दुर्गधी पसरुन आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन आसपासच्या रहिवाशांनी त्यास कडाडून विरोध केला. मात्र स्थानिकांचा विरोध डावलून सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासन सिद्धार्थ रुग्णालयात शवविच्छेदन आणि शवागार केंद्र उभारण्यावर ठाम राहिले. सध्या या शवविच्छेदन आणि शवागार केंद्राचे काम जोमाने सुरू आहे.
अनेक वेळा तक्रारी करुनही शवविच्छेदन आणि शवागार केंद्र उभारण्यात येत असल्यामुळे अखेर स्थानिक रहिवाशांनी रविवारी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. रहिवाशांनी दणका देताच रुग्णालयाच्या प्रशासनाने शवविच्छेदन आणि शवागार केंद्राचे काम बंद केले.
शवविच्छेदन केंद्र आणि निवासी इमारतींमध्ये साधारण १५० फूट अंतर असावे असा निकष आहे. मात्र या केंद्राच्या सभोवताली सुमारे २० ते ६० फूट अंतरावर निवासी इमारती आहेत. शवविच्छेदन आणि शवागार केंद्रामुळे पसरणाऱ्या दरुगधीमुळे आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. अरुंद रस्त्यावर रुग्णवाहिकांचा वावर वाढल्यानंतर वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या आवारातील नाल्यावरील मोकळ्या जागेत अथवा अन्यत्र शवविच्छेदन आणि शवागार केंद्र उभारावे, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात आली आहे.
मुंबईत १७ ठिकाणी शवविच्छेदनगृहे उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून त्यापैकी एक सिद्धार्थ रुग्णालयात बांधण्यात येत आहे. रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीची उंची वाढविण्याचा, रुग्णालयाच्या मागील भाग बंदीस्त करण्याची तसेच दरुगधी पसरु नये याची काळजी घेण्यात आली असून रहिवाशांनी सहकार्य करावे, असे फलक शिवसेना आमदार सुभाष देसाई यांनी या परिसरात झळकविले होते. त्यामुळे रहिवासी अधिकच संतप्त झाले आणि अखेर रविवारी ते रस्त्यावर उतरले.
‘करुन दाखविले’च्या यादीत भर घालण्यासाठी शिवसेना स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याशी खेळत आहे. सर्व निकष धाब्यावर बसवून शवविच्छेदन आणि शवागार केंद्र उभारण्यात येत असून त्याचा फेरविचार करावा. अन्यथा अधिक तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 3:05 am

Web Title: residencials come on street against siddharth hospital mortuary
Next Stories
1 ठाण्याच्या क्रांती दौडला ढिसाळ नियोजनाचा फटका!
2 ‘बदली’ मागणाऱ्या कैद्याचे ‘शोले’ स्टाइल कारनामे
3 ठाण्यातील पतपेढी दरोडाप्रकरणी तीन संशयितांना अटक
Just Now!
X