मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी निवासी डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली. त्यामुळे संतप्त झालेल्या डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेने बाह्य़ रुग्ण विभागातील सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या १५ दिवसांतील ही चौथी घटना असून, याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

रुग्णालयातील ‘मेडिसिन’ विभागात दाखल असलेल्या १३ वर्षांच्या मुलाचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी वॉर्डमध्ये आरडाओरडा करायला सुरुवात केली आणि वाद वाढतच गेला. नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीमध्ये प्रथम वर्षांच्या दोन निवासी डॉक्टरांना दुखापत झाली. या घटनेविरोधात निषेध नोंदवित ‘मार्ड’ संघटनेने शनिवारी बाह्य़रुग्ण विभागातील निवासी डॉक्टरांची सेवा खंडित केली आहे.

मंगळवारी मध्यरात्रीही एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी तोडफोड केली. त्या वेळी डॉक्टर लपून बसल्याने ते बचावले होते. दोन दिवसांपूर्वीच मानखुर्द येथील आरोग्य केंद्रामध्येही डॉक्टरांना मारहाणीचा प्रयत्न झाला होता. रुग्णालयात पुरेशी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नसते. नातेवाईक आक्रमक झाल्यानंतर बचावासाठी सुरक्षारक्षक वेळेत येत नाहीत. वॉर्डमध्ये पुरेसे चतुर्थ कर्मचारी नसल्याने रुग्णांच्या रक्ताच्या चाचण्यापासून सर्व कामे नातेवाईकांना कराव्या लागतात. त्यामुळेही नातेवाईक वैतागलेले असतात. त्याचा रागही ते आमच्यावर काढतात. याबाबत रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचे ‘मार्ड’च्या अध्यक्ष डॉ. कल्याणी डोंगरे यांनी सांगितले.

‘मार्ड’च्या मागण्या..

प्रत्येक वॉर्डमधील सुरक्षा व्यवस्थेसह चतुर्थश्रेणी वर्गातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी. नातेवाईकांच्या भेटीचे तास निश्चित करून सुरक्षेच्या दृष्टीने नातेवाईकांना रुग्णालयात सोडण्यासाठी पास व्यवस्था सुरू करावी. तसेच गंभीर प्रकृती असलेल्या किंवा मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची समुपदेशन करणारी व्यवस्था निर्माण व्हावी, अशी मागणी ‘मार्ड’ संघटनेने रुग्णालय प्रशासनाकडे पत्राद्वारे केली आहे.

सुरक्षा व्यवस्थेत वाढ

या घटनेविरोधात संस्थेनेही गुन्हा दाखल केला आहे. रुग्णालयीन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन मेडिसिन, स्त्रीरोग, बालरोग अशा गर्दीच्या वार्डमध्ये दोन सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. बाह्य़रुग्ण विभागात निवासी डॉक्टरांनी काम बंद केले असले तरी प्राध्यापक आणि इतर डॉक्टरांच्या साहाय्याने तपासण्या सुरू होत्या. त्यामुळे रुग्णसेवेवर याचा परिणाम झालेला नाही, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.