20 September 2018

News Flash

निवासी डॉक्टर आजारांच्या विळख्यात

शीव रुग्णालयात १३ डॉक्टरांना क्षयरोग

( प्रतिकात्मक छायाचित्र )

शीव रुग्णालयात १३ डॉक्टरांना क्षयरोग, १९ जणांना स्वाइन फ्लू तर डेंग्यूने सात बाधित

HOT DEALS
  • Apple iPhone 6 32 GB Gold
    ₹ 25900 MRP ₹ 29500 -12%
    ₹3750 Cashback
  • Lenovo K8 Plus 32GB Fine Gold
    ₹ 8190 MRP ₹ 10999 -26%
    ₹410 Cashback

रुग्णालय व वसतिगृहातील अपुऱ्या सोयीसुविधांमुळे शीवच्या ‘लोकमान्य टिळक पालिका वैद्यकीय महाविद्यालया’तील (शीव) निवासी डॉक्टर आजारांच्या विळख्यात सापडले आहे. या रुग्णालयातील २०१६-१७ या कालावधीत १३ डॉक्टरांना क्षयरोगाची लागण झाली असून दोन निवासी डॉक्टरांना ‘एमडीआर’ पातळीचा क्षयरोग झाला आहे. वर्षभरात येथील  १९ निवासी डॉक्टरांना स्वाइन फ्लू व ७ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. रुग्णालय व वसतिगृहातील अपुऱ्या सोयीसुविधांमुळे आजारांची लागण झाल्याचा आरोप निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ या संघटनेने केला आहे.

गेली अनेक वर्षे तक्रार करूनही निवासी डॉक्टरांना मिळणाऱ्या सेवेत सुधारणा झाली नसल्याने निवासी डॉक्टरांनी शीव रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. जयश्री मोंणकर यांची भेट घेतली. शीव रुग्णालयाच्या आवारात निवासी डॉक्टरांसाठी गेट क्रमांक-१ जवळ वसतिगृह आहे तर उरलेले काही निवासी डॉक्टर आसपासच्या परिसरातील वसतिगृहात राहतात. शीव रुग्णालयाजवळच वसतिगृहाच्या दोन इमारती आहेत. मात्र येथे जवळपास उपाहारगृह नसल्याने निवासी डॉक्टरांना बाहेरील उपाहारगृहांमध्ये जावे लागते. पालिका रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण तपासणीसाठी येत असतात. शीव रुग्णालयाजवळ द्रुतगती मार्ग असल्याने येथे दररोज अपघाताची अनेक प्रकरणे येतात. त्यामुळे दिवसभर कामाचा खूप ताण असतो. अनेक निवासी डॉक्टरांना दिवसाची चार ते पाच तास झोपही मिळत नाही. तर अनेक वेळा त्यांना सलग दोन दिवसही काम करावे लागते. अशा परिस्थितीत वसतिगृहात तरी चांगली सुविधा उपलब्ध व्हावी, अशी डॉक्टरांची अपेक्षा आहे. परंतु, पालिकेच्या या रुग्णालयात सोयीसुविधांचा अभाव आहे.

रुग्णालयाच्या आवारातील जुन्या ‘आरएमओ’ इमारतीची काही दिवसांपूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र दुरुस्तीनंतर लगेचच वसतिगृहांमध्ये गळती सुरू झाली. इथली शौचालयेही स्वच्छ व सुस्थितीत नाहीत. जुन्या आरएमओ वसतिगृहात २११ निवासी डॉक्टर राहतात. येथील डॉक्टरांना स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे यासाठी ‘वॉटर प्युरिफिकेशन’ यंत्र लावण्याची मागणी केली होती. मात्र तेही व्यवस्थापनाकडून उपलब्ध होऊ  शकले नाही. तर नव्या वसतिगृहात १७३ पदव्युत्तर निवासी डॉक्टर, २५ पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी राहतात. आणखी एका इमारतीत ३५० पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी राहतात. असे असतानाही येथे उपाहारगृह उपलब्ध नसल्याचे निवासी डॉक्टरांचे म्हणणे आहे.

आम्ही आमच्या मागण्या शुक्रवारी सकाळी शीव रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. जयश्री मोंणकर यांना सादर केल्या आणि याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. सार्वजनिक रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या सुरक्षिततेबरोबरच आरोग्याच्या प्रश्नाकडेही लक्ष द्यायला हवे.

– डॉ. लोकेश चिरवाटकर, मार्ड अध्यक्ष,  (शीव रुग्णालय)

निवासी डॉक्टरांच्या सर्व मागण्या ऐकून घेण्यात आल्या आहेत. येत्या दहा दिवसांत वैद्यकीय शिक्षण विभागाकडे निवासी डॉक्टरांच्या मागण्या पोहोचविण्यात येईल. नव्या इमारतीत चांगले उपाहारगृह सुरू करण्यासाठी नव्याने निविदा मागविण्यात येणार आहेत.

– डॉ. जयश्री मोंणकर, अधिष्ठाता, शीव रुग्णालय

First Published on October 7, 2017 3:52 am

Web Title: resident doctor illness problem swine flu dengue