केईएम, शीव रुग्णालयांतील आरोग्याचा प्रश्न गंभीर

मुंबईतील पालिकेच्या केईएम, लोकमान्य टिळक (शीव) रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाली आहे. मुंबईच्या केईएम रुग्णालयात चार निवासी डॉक्टरांना आणि गेल्या महिन्यात शीव रुग्णालयातील चार निवासी डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाली होती.

जून महिन्यात केईएम रुग्णालयाच्या आवारातील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाच्या इमारतीखाली व रुग्णालयाच्या गच्चीवर डेंग्यूच्या अळ्या सापडल्याचे वृत्त ‘लोकसत्ता मुंबई’मध्ये प्रसिद्ध केले होते. यानंतर तातडीने केईएम रुग्णालयाची तपासणी करण्यात आली होती. पालिकेकडून डेंग्यूच्या ‘एडिस इजिप्ती’ या डासांच्या अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठय़ा प्रमाणात जनजागृती केली जाते. मात्र नागरिकांना स्वच्छतेचे धडे देणाऱ्या महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांच्या आवारातच डेंग्यूच्या अळ्या सापडल्यामुळे निवासी डॉक्टरांनाच डेंग्यूची लागण होत आहे. गेल्या महिन्यात शीव रुग्णालयातील चार निवासी डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाली होती. हे चारही डॉक्टर रुग्णालयाच्या आवारातील वसतिगृहात राहत होते, तर काही दिवसांपूर्वी केईएम रुग्णालयातील चार निवासी डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाली असून यातील तीन निवासी डॉक्टर असून उरलेले एक डॉक्टर महिला प्रशिक्षणार्थी आहे.

दर वर्षी पालिका रुग्णालयातील वसतिगृहात राहणाऱ्या निवासी डॉक्टरांना डेंग्यूची लागण होते. गेल्या वर्षी केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहातील कूलरमध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडल्या होत्या. यामुळे येथील चार निवासी डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाली होती. तर २०१४ साली ऑक्टोबर महिन्यात भूलतज्ज्ञ विभागात तिसऱ्या वर्षांला शिकणाऱ्या २३ वर्षीय श्रुती खोब्रागडे या निवासी डॉक्टरचा डेंग्यूची लागण झाल्यामुळे मृत्यू ओढवला होता. श्रुती ही केईएम रुग्णालयाच्या आवारातील महिला वसतिगृहात राहत होती. डेंग्यूची लागण झाल्यानंतर प्लेटलेट्स झपाटय़ाने कमी झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. या वसतिगृहाजवळ अनेक अनावश्यक वस्तू जमा करून ठेवल्या आहेत. त्यातच डेंग्यूच्या अळ्यांची पैदास होऊन श्रुतीला जीव गमवावा लागला, असे या रुग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

प्रतिबंधासाठी विशेष समिती

केईएम रुग्णालयातील डेंग्यू प्रतिबंध करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली असून डेंग्यूच्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी काळजी घेण्यात येत आहे, अशी माहिती पालिकेच्या कीटकनाशक विभागाचे प्रमुख राजन नारिंग्रेकर यांनी दिली. गेल्या महिन्यात चार निवासी डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाली होती. मात्र सध्या या चारही डॉक्टरांची प्रकृती स्थिर आहे, असे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.