दहा दिवसांमागे एका रजेच्या निर्णयाला विरोध

मुंबई: मोठय़ा करोना केंद्रामध्ये सुरू होणाऱ्या २५० अतिदक्षता खाटा बाह्य़स्रोताद्वारे न चालविता पालिकाच चालविणार आहे. यासाठी निवासी डॉक्टरांना दहा दिवस सलग कामानंतर केवळ एकच दिवस रजा देण्याचा पालिकेने निर्णय घेतला आहे. यावर संतप्त झालेल्या मार्ड संघटनेकडून गुरुवारपासून सात दिवस निषेध नोंदविण्यात येणार आहे.

गोरेगाव येथे २००, मुलुंडला २० आणि वरळीला ‘नॅशलन स्पोर्ट क्लब ऑफ इंडिया’मध्ये (एनएससीआय) ३० अशा २५० अतिदक्षता खाटा चालविण्याकरिता परिचारिका, वॉर्डबॉय इत्यादी मनुष्यबळ उपलब्ध केले असले तरी डॉक्टरांचे मनुष्यबळ अपुरे आहे. कंत्राटी पद्धतीने डॉक्टर नियुक्त करण्याकरिता जाहिराती काढूनही विशेष प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे अखेर पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या मदतीनेच हे विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आत्तापर्यंत दहा दिवस काम केल्यावर पाच दिवस विलगीकरण असे चक्रानुसार निवासी डॉक्टरांना काम दिले जात होते; परंतु आता अतिदक्षता खाटांसाठी मनुष्यबळ उभारण्यासाठी यांना दहा दिवसांच्या कामानंतर केवळ एकच दिवस रजा देण्याचे फर्मान पालिकेने काढले आहे.

निवासी डॉक्टरांमध्ये यामुळे नाराजी पसरली असल्याने गुरुवारपासून डाव्या हातावर दर दिवशी विविध रंगांच्या पट्टय़ा बांधून सात दिवस निषेध व्यक्त केला जाणार आहे.

बंधपत्रित सेवेचा मध्यममार्ग

अधिक मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी परीक्षा देऊन बाहेर पडणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना बंधपंत्रित सेवा त्यांच्याच महाविद्यालयात करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी ‘वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालया’कडे (डीएमईआर) केली आहे. पाच महिने करोना सेवेचा अनुभव असल्याने हे डॉक्टर पुन्हा सेवेत रुजू झाले तर फायद्याचे ठरेल, असे पालिका रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले..