नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयातील विभागप्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांची अखेर राज्य शासनाने चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बदली केल्यानंतर निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेने आपला संप आज अखेर मागे घेतला. वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलेली सकारात्मक चर्चा व डॉ. व्यवहारे यांच्यावरील कारवाईमुळे संप मागे घेत असल्याचे ‘मार्ड’ने म्हटले आहे.

डॉ. मकरंद व्यवहारे यांच्याकडून छळणूक व लैंगिक शोषण होत असल्याचा निवासी डॉक्टरांचा आरोप असून त्यांच्या जाचाला कंटाळून निवासी डॉक्टर नितीन शरणागत याने १८ नोव्हेंबरला झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या गंभीर घटनेनंतरही डॉ. व्यवहारे यांच्यावर निलंबित करून चौकशी करण्याची कारवाई करण्यात टाळाटाळ झाल्यामुळे निवासी डॉक्टरांनी संप पुकारला होता.
डॉ. व्यवहारे हे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निकटचे नातेवाईक असल्यामुळे कारवाई होत नसल्याचा निवासी डॉक्टरांचा आरोप होता. मात्र वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी डॉ. व्यवहारे यांची बदली करून उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यामुळे तसेच ‘मार्ड’च्या अन्य मागण्या सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे या डॉक्टरांनी आपला संप आज दुपारी मागे घेतला.