नियोजन प्राधिकरण होताच कार्यवाही

नियोजन प्राधिकरणाचा दर्जा मिळाल्यानंतर ‘महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण’ (म्हाडा) जोरदार कामाला लागले आहे. म्हाडाने या अंतर्गत पहिले निवासयोग्य प्रमाणपत्र (ऑक्युपेशन सर्टिफिकेट- ओसी) जारी केले आहे. केवळ आठवडय़ाभरात म्हाडाने असे प्रमाणपत्र जारी करून पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागातील विलंबावर मात केली आहे. नियोजन प्राधिकरणाचा दर्जा मिळाल्यानंतर म्हाडा पुनर्विकासाला गती मिळावी, यासाठी तीन नव्या स्वतंत्र कक्षांचीही स्थापना करण्यात आली आहे.

कुर्ला पूर्व नेहरूनगर येथील त्रिमूर्ती गृहनिर्माण संस्थेला निवासयोग्य प्रमाणपत्र जारी करण्यात आले आहे. म्हाडाला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा मिळाल्यानंतर आतापर्यंत म्हाडाकडे २६ प्रस्ताव दाखल झाले आहेत. यामध्ये निवासयोग्य प्रमाणपत्र, आराखडय़ात सुधारणा तसेच पुढील बांधकाम सुरू करण्याबाबतचे प्रमाणपत्र यासह नव्या परवानग्यांचा समावेश आहे. पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाकडून या फायली म्हाडाकडे आल्यानंतर त्यावर लगेच कार्यवाही सुरू करण्यात आली असून त्यामुळेच निवासयोग्य प्रमाणपत्र तातडीने जारी करण्यात आले आहे. नवे पाच ते सहा प्रस्ताव असून त्यावरही विशेष कक्षाला तातडीने कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे.

म्हाडा वसाहतींच्या अभिन्यासाचा रखडलेला प्रश्न मार्गी लागावा यासाठी मुख्य वास्तुरचनाकारांच्या अंतर्गत विशेष अभिन्यास कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याशिवाय म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकास प्रकल्पांसाठी स्वतंत्र कक्ष कार्यरत असून याशिवाय पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाला गती मिळेलच.

याशिवाय परवडणाऱ्या घरांचा साठाही म्हाडाच्या पदरात पडेल, असा विश्वास म्हैसकर यांनी व्यक्त केला.

फुटकळ भूखंडांतूनही म्हाडाला घरे हवीत!

फुटकळ भूखंड (टिटबिट) वितरणाचे अधिकार म्हाडाकडे आल्यामुळे आता मुंबई गृहनिर्माण मंडळाने या फुटकळ भूखंडापासून घरांचा साठा मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या आधी मंजूर झालेल्या प्रस्तावांचीही त्या दिशेने छाननी करण्याचा प्रयत्न मुंबई गृहनिर्माण मंडळाचे नवे मुख्य अधिकारी दीपेंद्रसिंग कुशवाह यांनी सुरू केले आहेत. तसे झाले तर आणि पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर करण्यास सांगितल्यानंतर पुनर्विकास प्रकल्प पुन्हा रखडणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नव्या प्रस्तावांबाबत म्हाडाने तसा विचार करण्यास हरकत नाही, अशी मागणी जोर धरत आहे.

म्हाडा वसाहतींचा तातडीने पुनर्विकास व्हावा आणि त्याअनुषंगाने परवडणाऱ्या घरांची संख्या वाढविण्याचाही आपला प्रयत्न आहे. त्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली असून या कक्षांच्या कार्यपद्धतीवर आपण जातीने लक्ष ठेवून आहोत.

मिलिंद म्हैसकर, उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा