आमदाराची वेळ मिळत नसल्याने नूतनीकरणानंतरही १५ दिवस बंद

नीलेश अडसूळ, मुंबई</strong>

कांदिवली येथील गोकुळनगरमधील महालक्ष्मी चाळीत आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या शौचालयांचे उद्घाटन करण्यास आमदारांना वेळ मिळत नव्हता. नूतनीकरण होऊन १५ दिवस उलटल्यानंतरही नव्या शौचालयांचा वापर करता येत नसल्यामुळे चिडलेल्या रहिवाशांनीच अखेर या शौचालयांचे उद्घाटन करत प्रश्न मिटवला.

कांदिवलीतील आमदार सुनील प्रभू यांनी आपल्या निधीतून या शौचालयांच्या नूतनीकरणाकरिता पैसा उपलब्ध करून दिला होता. गेले तीन महिने या शौचालयांचे काम सुरू होते. चाळकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता ते तोडण्यात आले. अशा वेळी रहिवाशांसाठी पर्यायी व्यवस्था के ली जाते. परंतु या ठिकाणी कोणतीच पर्यायी सोय देण्यात आली नाही. उलट नूतनीकरणादरम्यान जुन्या शौचालयाच्या टाकीतील मैला साधारण दोन आठवडे तसाच होता. रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागला. कोणतीही सोय उपलब्ध नसल्याने नागरिकांना तीन महिने त्रास सहन करावा लागला.

शौचालयाचे बांधकाम पूर्ण होऊ न पंधरा दिवस उलटले तरीही त्याला दरवाजे बसवण्यात आले नव्हते. त्यात उद्घाटन रखडल्याने ते वापरावयास खुले झाले नाही. शौचालयांअभावी चाळीतील महिला, लहान मुले, वयोवृद्ध आणि रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. अखेर संतप्त रहिवाशांनी रविवारी शौचालयाच्या चाव्या मिळवून अनौपचारिक उद्घाटन के ले आणि काही शौचगृहांचा ताबा घेतला. परंतु दुसऱ्याच दिवशी काही व्यक्तींनी पुन्हा शौचालयाला टाळे ठोकले. मंगळवारी सुनील प्रभू यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन होणार असल्याची माहिती रहिवाशांना मिळाली.

‘शौचालयांअभावी आम्हाला गेले तीन महिने त्रास होत आहे. आता शौचालये बांधून तयार असूनही आम्हाला केवळ उद्घाटनाअभावी वापरता येत नाहीत. आता आम्ही शौचालयांचा वापर सुरू करूनही पुन्हा टाळे ठोकून ती बंद करण्यात आली आहेत. हा चाळकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार आहे,’ असा आरोप रहिवाशांनी के ला. याबाबत आमदार प्रभू यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी हस्तांतरणाच्या तांत्रिक कारणांमुळे शौचालये सुरू करण्यास दिरंगाई झाल्याचे स्पष्ट केले.

म्हाडाने बांधलेली शौचालये प्रथम पालिके ला हस्तांतरित करावी लागतात. स्थानिकांच्या अडचणी लक्षात घेऊ नच शौचालयांचे नूतनीकरण के ले गेले. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे याला दिरंगाई झाली. मंगळवारी अधिवेशनानंतर तातडीने मी शौचालयाचे हस्तांतरण करणार आहे. त्या वेळी नागरिकांच्या झालेल्या गैरसोयींबद्दल आणि स्थानिक समस्यांविषयी नागरिकांशी संवाद साधणार आहे.

– सुनील प्रभू, आमदार, दिंडोशी विधानसभा