कुलाबा मार्केटमधील पहिल्या कोळी लेनमधील डॉ. फर्नाडिस चाळ मोडकळीस आली आणि पालिकेने ती धोकादायक म्हणून जाहीर केली. त्यामुळे या इमारतीमधील २७ रहिवासी १९८२मध्ये कुलाबा संक्रमण शिबिराच्या आश्रयाला आले. आता मूळ इमारतीच्या भूखंडावर पालिका शाळेचे आरक्षण असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्या जागेत पुन्हा कधी तरी राहायला जाऊ या आशेवर पाणी फिरले आहे.
या रहिवाशांपैकी एक विठ्ठल भालेराव. कला निकेतनमध्ये वाहनचालक म्हणून नोकरी करणारे भालेराव आपल्या तुटपुंज्या पगारात संसाराचा गाडा पुढे रेटत होते. संक्रमण शिबिरात राहावयास आले तेव्हा त्यांचा मुलगा गणेश इयत्ता पाचवीमध्ये शिक्षण घेत होता. १९८९ मध्ये विठ्ठल भालेराव यांचे निधन झाले आणि या कुटुंबार दु:खाचा डोंगर कोसळला. आपले शिक्षण पूर्ण करून गणेशने संसाराचा गाडा आपल्या खांद्यावर घेतला. आजघडीला गणेशलाही मुलेबाळे झाली. मोठा मुलगा विशाल १२ वीमध्ये, तर मुलगी शिवानी १०वीमध्ये शिकत आहे. शाळेच्या आरक्षणामुळे मूळ इमारतीच्या जागी घर मिळण्याची शक्यताच नसल्यामुळे आपल्या पुढच्या पिढय़ांनाही संक्रमण शिबिरात खितपत पडावे लागणार की काय, या भीतीने ते कायम अस्वस्थ असतात.
म्हाडाने त्याच जागेवर बांधलेली एक इमारत डोळ्यासमोर दिसत आहे. पण संक्रमण शिबिरातील २१० कुटुंबांना त्यात कसे सामावून घेणार हा प्रश्न आहे.
 शिबिरातील अनुभवाबद्दल रहिवासी सांगतात, ही वसाहत म्हणजे अस्वच्छतेचे आगार आहे. नजर जाईल तेथे अस्वच्छता, डासांचा सुळसुळाट, यामुळे वर्षभर साथीच्या आजारांचा येथे मुक्कम असतो. आरोग्याची काळजी घेण्यासाठी कीटकनाशकांवर रहिवाशांना मोठा खर्च करावा लागतो. आता तर पाण्याची टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे पाणीही विकत घ्यावे लागत लागत आहे.
कुलाब्यातील पाचव्या कोळी गल्लीमधील १०० वर्षे जुनी मणिबेन देसाई बिल्डिंग धोकादायक बनली आणि १९९६ मध्ये तेथील रहिवाशांची रवानगी कुलाबा संक्रमण शिबिरात करण्यात आली. मणिबेन देसाई इमारतीच्या जागी नवी इमारत कधी उभी राहणार हे या रहिवाशांना माहीत नाही. आपल्या कुटुंबकबिल्यासह संक्रमण शिबिरातील पर्यायी घरात राहावयास आलेले प्रकाश दत्ताराम पाटकर म्हणाले की, संक्रमण शिबिरातील अस्वच्छता, असुरक्षितता आणि टेकू लागलेल्या घरात राहणे दिवसेंदिवस अशक्य बनत आहे. या इमारतीत वीज गेल्यावर तक्रार करूनही त्याची कुणी दखल घेत नाही. दूषित पाणीपुरवठा आणि अस्वच्छतेमुळे कुटुंबातील कुणीतरी एक कायम आजारी असते. पर्यायी घरही धोकादायक बनले असून टेकूच्या आधारावर जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे.