रुळांखाली मरीआईची मूर्ती असल्याचा स्थानिकांचा दावा; दर वर्षी आषाढ महिन्यात देवीला कोंबडी-बकऱ्याचा नैवेद्य
‘कृपया रेल्वेरूळ ओलांडू नका, ते धोक्याचे आणि प्राणघातक ठरू शकते’, अशा सूचना रेल्वेतर्फे वारंवार केल्या जात असल्या, तरी प्रवाशांकडून त्या गांभीर्याने घेतल्या जात नसल्याचे स्पष्ट होत आहे. चेंबूर स्थानकाजवळ गेले महिनाभर स्थानिक रहिवाशांसह आसपासच्या परिसरातील रहिवासी रुळांवर उतरून रुळांना हळद-कुंकू, हार, फुले आदी वाहून यथासांग पूजा करत आहेत. या स्थानिकांच्या मते या ठिकाणी रेल्वे रुळांखाली मरीआईची मूर्ती आहे. या मूर्तीची पूजा करण्यासाठी आषाढ महिन्यात रहिवासी येथे जमा होतात आणि देवीला कोंबडय़ा-बकऱ्यांचा नैवेद्य दाखवतात. विशेष म्हणजे या लोकांवर रेल्वे पोलीस वा रेल्वे सुरक्षा दल यांच्याकडून काहीच कारवाई होत नाही.
चेंबूर स्थानकाच्या दक्षिणेकडे म्हणजे टिळकनगर स्थानकाच्या दिशेला डाऊन मार्गावर १७/१३ए या क्रमांकाच्या खांबाजवळ गेले १५-२० दिवस रुळांवर फुले-हार यांचा ढीग दिसत आहे. तसेच दुपारच्या वेळेत या ठिकाणी रुळाभोवती काही बायका व पुरुष जमा होऊन रुळांची साग्रसंगीत पूजा करत असल्याचेही आढळते. चौकशीअंती काही स्थानिक रहिवासी ही पूजा करत असल्याचे कळते.
या रहिवाशांच्या मते या ठिकाणी रुळांखाली मरीआईची मूर्ती आहे. रेल्वेमार्ग तयार होण्याआधीपासूनच मरीआईचे मंदिर होते. त्या ठिकाणी रेल्वेमार्ग बांधताना देवीची मूर्ती रुळांखाली गेली. दर वर्षी आषाढ महिन्यात येथील रहिवासी तसेच वाशी, गोवंडी अशा परिसरातील भाविक येथे देवीची पूजा करण्यासाठी गोळा होतात. देवीची पूजा करण्यासाठी रीतसर अगरबत्त्या, हार-फुले, नारळ आदी ऐवज आणला जातो. त्याशिवाय देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी खाद्यपदार्थही घरून तयार करून आणले जातात. तसेच नैवेद्य म्हणूनच कोंबडी वा बकराही कापला जातो.
रेल्वे अधिनियमानुसार रेल्वेरूळ ओलांडणे किंवा रेल्वेमार्गावर चालणे हा दंडनीय अपराध आहे. त्याहीपेक्षा रेल्वेरुळांवर अशा प्रकारची पूजा करणे धोकादायक आहे. असे असूनही दर वर्षी आषाढात ही पूजा जवळपास दर दिवशी राजरोस सुरू असते. याबाबत स्थानकावरील लोहमार्ग पोलिसांना विचारले असता, रहिवाशांना अडवण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो. पण हा श्रद्धेचा भाग असल्याने आम्ही जोरजबरदस्ती करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. रेल्वेरूळ ओलांडणाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार रेल्वे सुरक्षा दलाला आहे. मात्र रेल्वे सुरक्षा दल याबाबत अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट होत आहे.