करोनामुळे लॉकडाउन जाहीर झाला आणि अनेकांवर संकट ओढावलं. मात्र या परिस्थितीतही काही ठिकाणी लोक एकमेकांच्या मदतीला धावून माणुसकी अद्यापही जिवंत असल्याचं दाखवून देत आहेत. अशीच मुंबईतील एक घटना समोर आली आहे. दक्षिण मुंबईतील नेपियन्सी रोडवरील पाणीपुरी विक्रेते भगवती यादव यांचा करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर तेथील रहिवाशांनी त्यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी धाव घेतली आहे.

जवळपास ४६ वर्षांपासून परिसरात पाणीपुरी विक्री करणाऱ्या भगवती यादव यांचा एका महिन्यांपूर्वी करोनामुळे मृत्यू झाला. आपल्या लाडक्या भगवती यादव यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर तेथील रहिवाशांनी कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी मोहीम सुरु केल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

भगवती यादव हे बिस्लेरी पाणीपुरीवाला म्हणून प्रसिद्ध होते. पाणीपुरी तसंच इतर पदार्थांसाठी ते बिस्लेरीचा वापर करत असल्याने त्यांना हे नाव पडलं होतं. ४६ वर्षांपासून भगवती यादव फक्त बिस्लेरीचा वापर करत होते असं तेथील रहिवाशी सांगतात. रहिवाशांनी ४२ दिवसात पाच लाखांची आर्थिक मदत उभा करण्याचा निर्धार केला असून दोन दिवसांतच त्यांच्याकडे दोन लाख रुपये जमा झाले आहेत.

“कुटंबाची जबाबदारी त्यांच्या एकट्याच्या खांद्यावर होती. आम्ही त्यांच्या मुलीच्या संपर्कात आहोत. आम्हाला त्यांच्या कुटुंबाला मदत केली पाहिजे असं वाटलं, यामुळे जास्त विचार न करता क्राउडफंडिंग वेबसाइटवर आम्ही आव्हान केलं. दोन दिवसात आमच्याकडे दोन लाख रुपये जमा झाले आहेत,” अशी माहिती तेथील रहिवासी यश यांनी दिली आहे.

भगवती यादव स्वच्छतेसाठी प्रसिद्ध होते. यामुळेच इतर पाणीपुरी विक्रेत्यांच्या तुलनेत त्यांना जास्त पसंती मिळत होती. याशिवाय त्यांच्याकडे मिळणाऱ्या पदार्थांची चवदेखील इतरांपेक्षा चांगली होती. ते सर्व साहित्य घरीच तयार करायचे. त्यात कोणतंही मिश्रण नसल्याचं रहिवासी सांगतात. भागवती यादव यांची मुलगी सध्या उत्तर प्रदेशातील आझमगड येथील आपल्या घरी आईसोबत वास्तव्यास आहेत. लोकांचं आपल्या वडिलांवरील प्रेम पाहून भारावून गेलो असल्याची प्रतिक्रिया तिने दिली आहे.